शिरुरमध्ये शिक्षक दिनानिमित्त तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण

मुख्य बातम्या शिरूर तालुका

रामलिंग महीला उन्नती बहु सामाजिक संस्था व अशोक बापू पवार मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षकांचा सन्मान 

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) मुलांना शिक्षण हे मातृभाषेतून द्यायला हवे, तेव्हा त्यांचा सर्वागीण विकास होईल. जिल्हा परिषद, नगरपालिका शाळेतील शिक्षक हे हुशारच असतात. तिथे शिकणारी मुलेही हुशार आहेत. त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे. त्यामुळे सर्व शिक्षकांनी संघटित रहायला हवे असे प्रतिपादन शिरुर नगरपालिका शाळेचे माजी मुख्याध्यापक नारायण निंबाळकर यांनी केले.

भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस 5 सप्टेंबर हा शिक्षक दीन म्हणून साजरा केला जातो. रामलिंग महिला उन्नती बहु.सामाजिक संस्था व आमदार अशोक बापू पवार मित्रमंडळ यांच्या वतीने मंगळवार (दि 5) रोजी शिक्षक दिनानिमित्त तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार अर्जुन निचीत तसेच आदर्श शिक्षिका पुरस्कार मीरा थोरात यांना देण्यात आला. सन्मानचिन्ह, शाल-श्रीफळ आणि फेटा बांधून दोन्ही शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. तसेच मुंबई बाजार येथील शिरुर नगरपालिकेच्या शाळा क्रं 5 आणि 7 येथे सर्व शिक्षक-शिक्षिका यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक नारायण निंबाळकर होते. डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करत या कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन रामलिंग महिला उन्नती बहु उद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले आणि आमदार अशोकबापू पवार मित्रमंडळ शिरुरच्या वतीने शिरुर शहर राष्ट्रवादी काँग्रेस लीगल सेलचे अध्यक्ष अ‍ॅड रविंद्र खांडरे यांनी केले होते.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक संतोष चव्हाण शिक्षिका उषा वेताळ, अर्जुन निचित, हंबिर सर, डॉ सुनीता पोटे,अ‍ॅड रवींद्र खांडरे, शोभना पाचंगे, राणी कर्डीले यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच संतोष चव्हाण, उषा वेताळ, नंदा वेताळ, वंदना भोसले, अंजली माने,कुसुम लांघी, धनंजय जाधव, भानुदास हंबीर या सर्व शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी दक्षता कमिटीच्या पुणे जिल्हा समन्वयक शोभना पाचंगे, शिरुर नगरपालिकेच्या माजी नगरसेविका कविता वाटमारे, निमोणे गावच्या माजी आदर्श सरपंच जिजाबाई दुर्गे, डॉ सुनीता पोटे, डॉ वैशाली साखरे, जया खांडरे, श्रुतिका झांबरे, राणी शिंदे, सुवर्णा सोनवणे, मीना गवारे, नसरीन शेख आदी मान्यवर उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक संतोष चव्हाण यांनी मान्यवरांचे स्वागत केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भानुदास हंबीर यांनी, तर आभार अ‍ॅड रविंद्र खांडरे यांनी मानले.