Leader

शिरूर तालुक्यात निवडणुकीच्या धामधुमीत चारा, पाणीटंचाईकडे दुर्लक्ष…

मुख्य बातम्या शिरूर तालुका

कान्हूर मेसाई (सुनिल जिते): मागील वर्षाच्या पावसाळ्यात पुरेसा पाऊस झालेला नसल्याने यंदा बहुतांश गावांत चारा, पाणीटंचाई आहे. अनेक भागांत जनावरे जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. मात्र, प्रशासनासह लोकप्रतिनिधी, नेते लोकसभा निवडणुकीत व्यस्त असल्याने चारा टंचाई, पाणीटंचाईसारख्या प्रमुख मुद्दे दुर्लक्षित असल्याचे दिसून येत आहे.

राज्यात गतवर्षीच्या पावसाळ्यात पुरेसा पाऊस झाला नाही. शिवाय अधिक काळ नद्या, नाले, झरे वाहिले नसल्याने पारंपरिक विहिरी, हातपंप, विंधन विहिरींच्या पाणी पातळीतही फारसी वाढ झाली नाही. त्याचे परिणाम आता दिसून लागले आहेत. यंदा जानेवारीपासूनच पाणीटंचाई जाणवू लागली आहे. चाऱ्याचा प्रश्‍नही गंभीर होत आहे. गावतलाव, पाझर तलाव कोरडे पडले असून विहीरी, हातपंप, विंधन विहिरी तळ गाठत आहेत.

मोठ्या तलावातील पाणीसाठाही झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे जनावरांचा चारा, पिण्याचे पाणी याचे प्रधान्याने नियोजन करण्याची गरज असताना प्रशासनासह लोकप्रतिनिधींकडून फारसे गांभिर्याने घेतल्याचे दिसत नाही. त्यामुळे जनावरे जगवण्यासह पाणीटंचाईवर मात करत फळझाडे जगवण्याची शेतकऱ्यांना चिंता लागली आहे.

सध्या लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. राज्यात मतदानाला अजून उशीर असला तरी सत्तेसाठी एकमेकांवर खालच्या पातळीवर जाऊन केलेले आरोप-प्रत्यारोप, उमेदवारीवरून नाराजी, अर्ज भरण्यापासून लोकांना खोटी आश्‍वासने देत मते मिळण्यासाठी आणि पुन्हा कशी सत्ता मिळेल यासाठी होणारी आखणी यात लोकप्रतिनिधी मग्न आहेत. प्रशासनही मतदान प्रक्रियेची तयारीत गुंतलेले असल्याने चाराटंचाई, पाणीटंचाई याकडे सपशेल दुर्लक्ष केले असल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागात मात्र लोक त्रस्त आहेत. आमदार, खासदारांसह आता होणाऱ्या लोकसभेसाठी उमेदवारी मिळालेले, संभाव्य उमेदवार यावर सध्या एकही शब्द बोलत नाही.

पुरेसा पाऊस झाला नाही की टंचाईला सामोरे जावे लागते. सातत्याने या समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे निवडणुकीत राजकीय पक्षांनी आता पाणी आणि चारा नियोजन हा प्रमुख अजेंडा झाला पाहिजे. या बाबत लोकांनीही सजग होऊन प्रतिक्रिया दिल्या पाहिजेत. कारण टंचाईसारख्या समस्येवर लोक बोलत नाहीत. राजकीय पक्षाने चारा आणि पाणी प्राधान्य दिले पाहिजे. बाजारात शेतीमालाला दर नाही. दुधाचे दर पुरेसे मिळत नाहीत. त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना पाणी, चाराटंचाईसारख्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.
– भास्कर पुंडे (जिल्हा सरचिटणीस अखिल भारतीय मराठा महासंघ )

शिरूरमध्ये तिहेरी लढत, मंगलदास बांदल यांना वंचितकडून उमेदवारी जाहीर…

शिरुरमध्ये अमोल कोल्हे यांच्याविरोधात बॅनरबाजी; 5 वर्ष कुठे होतात??

शिरूर लोकसभा निवडणूक! शिवाजीराव आढळराव पाटील की अमोल कोल्हे?