शौर्यदिन सोहळ्यामुळे पुणे नगर महामार्ग वाहतुकीत बदल

शिरूर तालुका

नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे प्रशासनाचे आवाहन

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) सह पेरणे ता. हवेली येथे एक जानेवारी २०२३ रोजी आयोजित जयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे अहमदनगर महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ३१ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून ते १ जानेवारी २०२३ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत या रस्त्यावरील वाहतूक बंद करुन पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी प्रशासनाला दिले आहेत.

कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील एक जानेवारी रोजीच्या कार्यक्रमामुळे येथील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शिक्रापूर ते चाकण अशी जाणारी येणारी सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. अहमदनगरकडून पुणे, मुंबईकडे येणारी जड वाहने पर्यायी मार्ग म्हणून शिरुर, न्हावरा फाटा, न्हावरा, पारगाव, चौफुला, यवत, सोलापूर रोड मार्गे पुण्याकडे येतील.

पुण्याहून अहमदनगरकडे जाणारी जड वाहने ही पुणे सोलापूर महामार्गाने चौफुला, केडगाव मार्गे, न्हावरा, शिरूर, अहमदनगर रोड अशी जातील. तर मुंबईकडून अहमदनगरकडे जाणारी जड वाहने, माल वाहतूक वाहने ही वडगांव मावळ, चाकण, खेड, मंचर, नारायणगाव, आळेफाटा मार्गे अहमदनगरकडे जातील तर हलकी वाहने कार, जीप आदी वडगाव मावळ, चाकण, खेड, पाबळ, शिरुर मार्गे अहमदनगरकडे जातील अशा पद्धतीने पर्यायी रस्ते वापरण्याचे आवाहन वाहन चालक व नागरिकांना करण्यात आले आहे.

1 जानेवारी रोजी शौर्यदिनी होणाऱ्या जयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या वेळी नागरिकांनी या पर्यायी मार्गाचा वापर करुन प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन देखील पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.