shirur-gangawane-family

समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण बस अपघातात शिरुर येथील पती-पत्नी व मुलीचा मृत्यू…

मुख्य बातम्या

शिरुर (मुकुंद ढोबळे): समृद्धी महामार्गावर बुलढाणा येथे झालेल्या भीषण बस अपघातात २६ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना आज (शनिवार) पहाटे घडली. या अपघातात शिरुर मधील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने शिरूर शहर व गंगावणे कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.

या अपघातात मृत्युमुखी पडलेले कैलास गंगावणे शिक्षक होते तर त्यांची पत्नी या गृहणी होत्या तर मुलगी वैद्यकीय शिक्षण घेत होती. शिरूर मुंबई बाजार येथे राहणारे हे कुटुंबीय नोकरीसाठी निरगुडसर येथे सध्या राहत होते. कैलास गंगावणे (वय ४८), कांचन कैलास गंगावणे (वय ३८) व सई गंगावणे (वय २०, रा. शिरुर, ता. शिरूर जि. पुणे) या तिघांचाही या अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने गंगावणे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

गंगावणे कुटुंबीयांच्या मुलाला नागपूरमधील विधी महाविद्यालयात प्रवेश मिळाला होता. नागपूर येथे महाविद्यालयात सोडून हे कुटुंबीय परतीच्या दिशेने निघाले होते. त्याच वेळेस त्यांच्यावर काळाने घाला घातला. गंगावणे यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण करून शिक्षक नोकरी करीत होते तर सई गंगावणे ही अतिशय हुशार विद्यार्थीनी होती. तिला तिच्या गुणवत्तेवर आयुर्वेदिक महाविद्यालयांमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळाला होता व ती वैद्यकीय शिक्षणाची विद्यार्थिनी होती.

शिरूर येथील रुपेश गंगावणे यांनी या घटनेस दुजोरा दिला असून, मयत कैलास गंगावणे हे त्यांचे चुलत बंधू होते. दुर्दैवी अपघात आणि प्रत्येकाला हळहळ वाटणारी घटना घडल्याने निरगुडसर गावावर शोककळा पसरली आहे. निरगुडसर (ता. आंबेगाव) येथील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयाचे विद्यार्थी प्रिय शिक्षक कैलास गंगावणे, कांचन गंगावणे आणि मुलगी सई गंगावणे यांचा समृद्धी महामार्ग येथे बसला लागलेल्या आगीत दुर्दैवी मृत्यू झाला.

विशेष म्हणजे त्यांच्या मुलाचे नागपूर येथील सेवा विधी महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया करून मुलाला सोडून तिघेजण माघार येत असताना सिंदखेड राजा येथे अपघातात त्यांचा मृत्यू झाला. ही घटना अत्यंत दुर्दैवी प्रत्येकाला हळहळ करणारी आहे. मुलाला नागपूर येथे सोडल्यानंतर आई-वडिलां समावेत मुलाचा अखेरचा फोटो ठरला आहे.

शिरूरच्या शिक्षक कुटुंबावर घाला; आई-वडिलांसोबतचा फोटो ठरला अखेरचा…