बिघडलेले पोटाचे तंत्र जागेवर येण्यासाठी आहारात बदल गरजेचाच

आरोग्य

उकाडा संपून आता पावसाचे वेध लागण्याचे दिवस. अशा वातावरणात नीट कडक ऊनही नसते आणि पाऊसही दबा धरुन बसल्या सारखा असतो. या काळात पोटाच्या समस्या निर्माण होण्याची सर्वाधिक शक्यता असते. पचनशक्ती क्षीण झाल्याने अनेकदा गॅसेस, अपचन, अ‍ॅसिडीटी अशा तक्रारी डोकं वर काढण्याची शक्यता असते. खाल्लेले नीट पचले नाही तर त्याचा पोटावर आणि एकूण पचनशक्तीवर ताण येतो आणि मग शरीराला जास्तीचे कष्ट घेऊन हे अन्नपदार्थ पचवावे लागतात. अनेकदा या काळात भूकही कमी होते. हवा सतत बदलत असल्याने आरोग्यावर त्याचा विपरीत परीणाम होत असतो. अशावेळी शक्यतो हलका आहार घेणे जास्त चांगले.

आपण दिवसभर विशेष कष्टाची कामं करत नसल्याने खाल्लेले अन्न पचत नाही. तसेच नव्याने भूकही लागत नाही. पण तोंडाला चाळा म्हणून किंवा खाण्याची इच्छा म्हणून आपण अनेकदा काही ना काही खात राहतो. मात्र असे न करता भूक लागेल तेव्हाच हलका आणि पोषक आहार घेणे आवश्यक असते. त्यामुळे पचनक्रियेला काही प्रमाणात आराम मिळण्याची शक्यता असते. अशावेळी पचनाला हलक्या आणि तरीही पौष्टीक अशा २ सूपच्या रेसिपी आपण पाहणार आहोत. या सूपमुळे ताकद मिळण्यास मदत होते आणि पोटही हलके राहते. पाहूयात हे सूप कोणते आणि ते कसे करायचे.

डाळींचे सूप

१) मूग, तूर आणि मसूर डाळ अर्धी वाटी घेऊन त्या स्वच्छ धुवून त्यात बसेल तेवढे पाणी घालून कुकरला शिजवायला लावाव्यात. साधारण ३ ते ४ शिट्ट्या घ्याव्यात.

२) झाकण पडल्या नंतर या डाळी चांगल्या हाटून घेऊन त्यामध्ये जवळपास दुप्पट पाणी घालावे.

३) यामध्ये साखर, मीठ, लिंबाचा रस घालून हे मिश्रण चांगले हाटून घ्यावे.

४) कढई मध्ये तेल घालून त्यामध्ये जीरे, हिंग, हळद घालावे. फोडणी तडतडली की त्यामध्ये मिरची, कडीपत्ता आणि लसणाच्या पाकळ्या घालाव्यात.

५) ही फोडणी डाळींच्या मिश्रणामध्ये घालून त्यावर वरुन कोथिंबीर घालावी. आवश्यकते नुसार पाणी घालून हे मिश्रण गॅसवर पुन्हा चांगले उकळावे.

६) तूप घालून हे डाळींचे सूप गरमागरम प्यावे.

भाज्यांचे सूप

१) घरात उपलब्ध असतील त्या फ्लॉवर, दुधी, गाजर, लाल भोपळा, फरसबी, कोबी, बीट अशा  सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून बारीक चिरुन घ्यायच्या.

२) या भाज्या कुकरच्या भांड्यात घालून त्यात पाणी घालून २ शिट्ट्या काढून घ्यायच्या.

३) गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल घालून आलं लसूण पेस्ट घालावी आणि ती थोडी लालसर होऊ द्यावी.

४) यामध्ये शिजलेल्या भाज्या पाण्यासहीत घालाव्यात.

५) एका वाटीत कॉर्न फ्लोअर घेऊन त्यात पाणी घालून ते चांगले मिसळून घ्यावे आणि कढईत घालावे. यामुळे घट्टपणा येण्यास मदत होते.

६) सूप चांगले शिजत आले की त्यामध्ये मीठ आणि मिरपूड घालावी. चांगले उकळल्या नंतर गरमागरम सूप पिण्यास तयार होते.

७) भाज्या कुकर मध्ये आणि पुन्हा कढई मध्ये शिजल्याने चांगल्या मऊ होतात. पण लहान मुले किंवा वयस्कर व्यक्तींना द्यायचे असल्यास हे सगळे झाल्यावर सूप मिक्सर मधून काढून बारीक करुन घेतले तरी चालते.

(सोशल मीडियावरुन साभार)