वाढलेली शुगरच नाही तर स्ट्रेस देखील ठरतो सर्वात मोठा शत्रू

आरोग्य

डायबिटिस असेल तर सावधान…..

भारतात डायबिटिज रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. फक्त वयस्कर नसून, कमी वयोगटातील लोकांमध्ये देखील ही समस्या दिसून येते. खराब जीवनशैली, व्यायामाचा अभाव व खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे हा आजार लोकांमध्ये वाढत आहे. इन्शुलिनच्या अपुऱ्या उत्पादनामुळे रक्तात साखर राहते, त्यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो. मधुमेहाचा हळूहळू शरीराच्या इतर भागांवर परिणाम होऊ लागतो. जसे की, डोळे, किडनी, यकृत, हृदय आणि पायांवर थेट परिणाम होतो. यासह ताण घेणे देखील मधुमेह रुग्णांसाठी घातक ठरू शकते.

यासंदर्भात, मॅक्स हेल्थकेअरच्या एंडोक्राइनोलॉजी व मधुमेह विभागाचे अध्यक्ष डॉ. अंबरीश मिथल सांगतात, “असे अनेक रुग्ण आहेत जे आहार, औषध आणि जीवनशैलीची काळजी घेतात, पण तरी देखील काहींची रक्तातील साखर वाढते. यानंतर असे आढळून आले की, लोकं घर आणि कामाच्या तणावामुळे खूप त्रस्त असतात, ज्यामुळे रक्तातील साखर झपाट्याने वाढते”

ताण आणि मधुमेहावर डब्ल्यूएचओचे मत…

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते, ”तणावाची व्याख्या चिंता किंवा मानसिक दबाव अशी केली जाऊ शकते. प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या तणावातून जात असतो. पण याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर पडतो. तणावाची असंख्य कारणे असू शकतात. जसे की, ऑफिसमध्ये टार्गेट पूर्ण न होणे, आर्थिक नुकसान, खराब आरोग्य, किंवा कौटुंबिक समस्या. तीव्र तणावामुळे काही काळ रक्तातील साखर वाढते, परंतु दीर्घकाळापर्यंत जास्त ताण धोकादायक ठरू शकते.”

तणावामुळे मधुमेह होऊ शकतो…

तणावामुळे कॉर्टिसोल आणि एड्रेनालाईन सारख्या तणाव संप्रेरकांची पातळी वाढते, ज्यामुळे शरीरात इन्शुलिन प्रतिरोधक क्षमता वाढते. इन्शुलिन हा आपल्या शरीरात तयार होणारा हार्मोन आहे. जो रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. जेव्हा ते शरीरात योग्यरित्या कार्य करत नाही, तेव्हा शरीरात साखर वाढू लागते.

तणावावर मात कशी करावी…?

प्रत्येकाकडे तणावावर मात करण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. कोणत्याही हिरव्यागार जागेत फेरफटका मारल्याने मन शांत होते. नृत्य हा एक उत्तम व्यायाम आहे, जो तणाव दूर करतो. यासह योग, प्राणायाम, ध्यान, संगीत, पुस्तक वाचन, चित्रपट पाहणे, मित्रांशी गप्पा, कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवणे यावर हे उपाय उत्तम ठरू शकते. कॅफिन, अल्कोहोल, धूम्रपान मर्यादित करा. पुरेशी झोप घेण्याचा प्रयत्न करा.

(सोशल मीडियावरुन साभार)