अकलूज: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया सुरू असतानाच अकलूज येथील यशवंत नगर मतदान केंद्रावर एक अनोखी आणि चर्चेची घटना घडली. जिल्हा परिषदेचे उमेदवार अर्जुनसिंह मोहिते पाटील यांच्यासोबत आलेल्या त्यांच्या लहान मुलाने थेट ईव्हीएम मशीनचे बटण दाबल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
मतदान केंद्रावर गोंधळ
घटनेची माहिती मिळताच मतदान केंद्रावर उपस्थित मतदारांमध्ये चर्चेला उधाण आले. काही वेळ वातावरण तणावपूर्ण झाले. केंद्राध्यक्षांनी तत्काळ हस्तक्षेप करत नियमांचा उल्लेख केला. लहान मुलांना मतदान केंद्रात प्रवेश देणे आणि मतदान प्रक्रियेत सहभागी करणे नियमबाह्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुलाने स्वतः बटण दाबल्याचा प्रकार
मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुनसिंह मोहिते पाटील हे आपला मुलगा रुद्रराज मोहिते पाटील याला मतदान प्रक्रिया प्रत्यक्ष दाखवण्यासाठी केंद्रात घेऊन आले होते. ईव्हीएमसमोर प्रक्रिया समजावून सांगत असतानाच मुलाने स्वतः बटण दाबले.
उमेदवाराची भूमिका
या घटनेवर प्रतिक्रिया देताना अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनी सांगितले की, मुलाला लोकशाही प्रक्रियेची ओळख करून देण्याचा त्यांचा उद्देश होता. आई-वडिलांचे मतदान प्रत्यक्ष पाहता यावे, एवढाच हेतू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अधिकाऱ्यांनी यावर फारसा आक्षेप घेतला नसल्याचाही त्यांनी दावा केला.
सोशल मीडियावर चर्चेचा विषय
अकलूजमधील ही घटना अल्पावधीतच सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, विविध स्तरांतून यावर प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. राज्यभरात मतदान उत्साहात सुरू असताना ही घटना विशेष लक्षवेधी ठरली आहे.
९ फेब्रुवारीला मतमोजणी
राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज (शनिवार, ७ फेब्रुवारी) मतदान होत आहे. मतदान सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत चालणार आहे.या निवडणुकीत ७३१ जिल्हा परिषद गट आणि १,४६२ पंचायत समिती गणांसाठी एकूण ७,४३८ उमेदवार रिंगणात आहेत.मतदानानंतर सोमवारी, ९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजेपासून मतमोजणी होणार असून, निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित भागातील आचारसंहिता संपुष्टात येईल.