बार्टीतील ३ संस्थांमधील गैरव्यवहारप्रकरणी अंबादास दानवेंनी वेधले सभागृहाचे लक्ष

महाराष्ट्र

मुंबई: सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून बार्टीअंतर्गत अनुसूचित जातीच्या मुलांना संशोधनासाठी दिले जाणाऱ्या प्रशिक्षणासाठी नेमलेल्या ३ संस्थांमध्ये मोठया प्रमाणात गैरव्यवहार झाला असल्याचे दाखले देत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

सामाजिक न्याय विभागाच्या वतीने बार्टीअंतर्गत अनुसूचित जातीच्या मुलांना संशोधनासाठी दिले जाणारे प्रशिक्षण सामाजिक न्याय विभागाचे पदसिद्ध अध्यक्ष व सचिव यांनी शासन निर्णय डावलून बंद केले का असा प्रश्न आज विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने परिषद सभागृहात दानवे यांनी उपस्थित केला. तसेच ३ संस्थांमध्ये सारखेच प्राध्यापक प्रशिक्षक म्हणून काम करत असून विद्यार्थ्यांचे अनुक्रमांक बदलले जात आहे. तसेच गुणांकन वाढवून दिले जात आहे.

तसेच या तिन्ही संस्थांचे कार्यालय हे मंगल कार्यालयात सुरू आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाला जबाबदार असणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणीही दानवे यांनी केली. तसेच हे प्रशिक्षण बंद झाल्यामुळे ९ हजार अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचे होत असलेल्या नुकसानाबाबतही दानवे यांनी सभागृहात आवाज उठवित सरकारला याबाबत उत्तर देण्यास भाग पाडले. या सर्व घटनांचा विद्यार्थ्यांवर परिणाम होणार नाही, याची पूर्ण दक्षता घेतली जाणार असल्याचे उत्तर सरकारकडून देण्यात आले.