भाजप कार्यकर्त्याला आमदाराच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मारहाणीप्रकरणी अंबादास दानवे आक्रमक

महाराष्ट्र

मुंबई: दहिसरमध्ये भाजप कार्यकर्त्याला स्थानिक आमदाराच्या कार्यकर्त्यांच्या जमावाने मारहाण केल्याचा मुद्दा आक्रमकपणे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात मांडून याप्रकरणी सरकारने खुलासा करावा, तसेच संबंधीतांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी दानवे यांनी केली.

राज्यात कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून असाच एकप्रकार दहिसर मध्ये समोर आला आहे. गेल्या चार ते सहा महिन्यात राज्यात शिवसैनिकांना मारहाणीचे प्रकार झाले असून वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे पोलिसांनी दाखल केले. पोलीस अशा प्रकरणांमध्ये एकांकी भूमिका घेत आहेत. दहिसर मध्ये लोकप्रतिनिधी व विधानसभेचे प्रतिनिधी यांच्या जवळपास ५० ते ५५ कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या एका कार्यकर्त्याला बेदम मारहाण केली. बिबीशन वारे अस त्या कार्यकर्त्यांच नाव आहे. मारहाणीच्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये तलवारी व हातात काठ्या लाट्या घेऊन हे सर्व लोकं त्या कार्यकर्त्याला मारत असल्याचे दिसत आहे. यात एका गुन्हेगाराचे नाव आशिष नायर असून त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे आहेत. यात आमदार यांच्या मुलाच्या ड्रायव्हरचा देखील समावेश आहे.

याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करायला विलंब लावला. तसेच पालिकेच्या रुग्णालय प्रशासनानेही त्या जखमी तरुणाला दाखल करुन घेण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे तरुणाला न्याय मिळावा यासाठी या प्रकरणाची सखोल चौकशी करून यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी दानवे यांनी सभागृहात केली.