मुंबईतील विधानभवन, उच्च न्यायालय, बीएसई व मेट्रोला बॉम्बची धमकी; सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी; विजय वडेट्टीवार

महाराष्ट्र

मुंबई: मुंबईतील विधानभवन, मुंबई उच्च न्यायालय, बीएसई आणि मेट्रोला बॉम्बने उडवून देण्याची धमकी ई-मेलद्वारे आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणाची सरकारने अत्यंत गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत केली.

सध्या विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असतानाच अशा प्रकारची धमकी येणे ही चिंतेची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. औचित्याच्या मुद्द्यावर बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, हा ई-मेल कोणी पाठवला आणि त्यामागे कोणती शक्ती आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणात खलिस्तानी संघटनेचा हात असल्याची चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.जर अशा महत्त्वाच्या ठिकाणांना उडवून देण्याच्या धमक्या येत असतील, तर हे आपल्या गुप्तचर यंत्रणेचे अपयश आहे का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

तसेच सध्या अमेरिका आणि इराण दरम्यान सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीचा या धमकीशी काही संबंध आहे का, याचीही चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. आंतरराष्ट्रीय पातळीवर ताणले गेलेल्या संबंधांमुळे भारतात दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा हा प्रयत्न असू शकतो, असेही ते म्हणाले.या संपूर्ण प्रकरणाचा गृहविभागाने सखोल तपास करून संबंधित ई-मेलचा उगम शोधून काढावा आणि याबाबत सभागृहात तातडीने निवेदन करावे, अशी आग्रही मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली.