पहीली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी पहा काय…

महाराष्ट्र

औरंगाबाद: विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी सरकारने पावले उचलली असून राज्यातील इयत्ता 1 ली ते 10 वीच्या विद्यार्थ्यांना पुस्तकाचा समावेश असलेल्या मोफत वह्या दिल्या जाणार आहेत.

सध्या विद्यार्थ्यांना एकाचवेळी वेगवेगळ्या विषयांची पुस्तके आणि तितक्याच प्रमाणात वह्यांचे ओझे पाठीवर वागवावे लागते. या ओझ्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनावरही भार पडत असल्यामुळे आता सरकारने वेगवेगळ्या विषयांच्या स्वतंत्र पुस्तकांऐवजी आता वह्यांमध्येच पुस्तके देण्याचा विचार केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत येताना केवळ एक वही आणावी लागणार असल्याचे केसरकर यांनी सांगितले.

पुढे बोलताना केसरकर म्हणाले की, शालेय विद्यार्थी विविध क्लासेस आणि गृहपाठाने त्रस्त आहेत. शाळांच्या अवास्तव वेळा आणि गृहपाठाला सकाळीच उठावे लागत असल्यामुळे मुलांचे बालपण दबले आहे. त्यांना स्वच्छंदी आणि स्वतंत्र वातावरणात वाढू दिले जात नसल्यामुळे त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास योग्यरीत्या होत नसल्याचे शास्त्रीयद़ृष्ट्या सिद्ध झाले आहे.

त्यामुळे मुलांचे बालपण जपण्यासाठी शिक्षणतज्ज्ञांचा सल्ला घेणार आहोत. शाळांच्या वेळा या मुलांच्या झोपेशी सुसंगत असल्या पाहिजेत. सकाळी सहा वाजता उठून मूल शाळेत जात असेल, तर अभ्यासात लक्ष देऊ शकत नाही. त्यामुळे मुलांच्या शाळेच्या वेळा सुसंगत ठेवून अभिनय, हस्तकला चित्रकला तसेच मैदानी खेळांमध्ये कौशल्य दाखवावे, यासाठी मुलांचा गृहपाठ कमी करण्याबाबत तज्ज्ञांचा सल्ला घेतला जात आहे.