विजबिल जास्त आल्याने तरुणाने महिला वीज कर्मचाऱ्यावर कोयत्याने सपासप वार करत केला खुन

क्राईम मुख्य बातम्या

बारामती (प्रतिनिधी) वीजबिल जास्त का आले म्हणून जाब विचारण्यास आलेल्या एका विकृत मानसिकतेच्या तरुणाने एका ३४ वर्षीय महिला वीज कर्मचाऱ्याचा कोयत्याने वार करुन खात्मा केल्याची घटना मोरगाव (ता. बारामती) येथे आज सकाळी ११:१५ वाजण्याच्या सुमारास घडली असुन या घटनेत एका महिला कर्मचाऱ्याचा हकनाक बळी गेला आहे. रिंकू बनसोडे यांच्या मृत्यूने महावितरणमधील कर्मचाऱ्यांवर शोककळा पसरली आहे. तसेच या घटनेचा कर्मचाऱ्यांसह सर्वच स्तरातून निषेध नोंदवला जात आहे.

 

मुळच्या लातूर शहरातील रहिवासी असलेल्या रिंकू गोविंदराव बनसोडे ह्या दहा वर्षापूर्वी दि २९ ऑगस्ट २०१३ रोजी महावितरणच्या सेवेत दाखल झाल्या होत्या. गेल्या दहा वर्षापासून त्या मोरगाव येथेच कार्यरत होत्या. नोकरी लागल्यानंतर काही दिवसात रिंकू बनसोडे यांचा विवाह झाला. त्यांना एक वर्षाचा मुलगा आहे. दहा दिवसांची सुटी उपभोगून त्या आज (दि. २४) मोरगाव कार्यालयात कामावर रुजू झाल्या होत्या.

 

आज बुधवार (दि. २४) रोजी सकाळी ११:१५ च्या सुमारास त्या एकट्याच कार्यालयात होत्या. दरम्यान जणू काळ बनून संपूर्ण तयारीनिशी आलेल्या अभिजीत पोटे या व्यक्तीने रिंकू यांना बील जास्त आल्याचा जाब विचारला आणि एकामागोमाग एक असे जवळपास १६ वार रिंकू यांच्या हातापायावर व तोंडावर केले. काही कळायच्या आतच रिंकू रक्ताच्या थारोळ्यात पडल्या. मोरगाव येथे प्रथमोपचार केल्यावर त्यांना तातडीने पुण्यातील सह्याद्री हॉस्पीटल मध्ये उपचारासाठी दाखल केले. परंतु दुर्दैवाने उपचारा दरम्यान दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

 

फक्त ५७० रुपयांच्या विज बिलासाठी हल्ला

ज्याने हल्ला केला त्या आरोपीचे वीजबिल रत्नाबाई सोपान पोटे या नावाने आहे. त्या वीजबिलाचा ग्राहक क्रमांक 186640053549 असा असून चालू एप्रिल २०२४ या महिन्याचे ६३ युनीट वीजवापराचे वीजबिल ५७० रुपये इतके आहे. मागील १२ महिन्याचा वापर तपासला असता तो ४० ते ७० युनीटमध्ये आहे. थकबाकी नाही. उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे चालू महिन्यात वापर ३० युनीटने वाढला व त्याचे बील ५७० आले होते. हे बील वापरानुसार व नवीन दरानुसार योग्यच आहे. तसेच सदर ग्राहकाची वीजबिलाबाबत कोणतीही लेखी अथवा ऑनलाईन तक्रार नोंदवलेली नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत