स्वाभिमानाचा आणि आत्मसिश्वासाचा हुंकार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज; खासदार राहुल शेवाळे

महाराष्ट्र

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त चेंबूर येथील आर सी एफ कर्मचारी संघ (बी एम एस ) या कामगार संघटनेच्या वतीने सिंहगड किल्ला ते चेंबूर अशी शिवज्योत आणण्यात आली.

शिवज्योतीच्या आगमनाच्या प्रसंगी आर सी एफ चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्रीनिवास मुडगेरीकर, सुभेदार नरवीर तानाजी – सूर्याजी मालुसरे यांचे पोलादपूर तालुक्यातील वंशज रवींद्र मालुसरे, खासदार राहुल शेवाळे, आर सी एफ कर्मचारी संघाचे उपाध्यक्ष संजय उपाध्याय, कार्याध्यक्ष राजेश सिंग, नगरसेवक महादेव शिवगण, माजी नगरसेविका श्रीमती निर्मला सिंग, माजी नगरसेविका राजेश्री पालांडे यांच्यासह विविध संघटनांचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. रवींद्र मालुसरे यांचा यावेळी शाल, पगडी, सन्मानचिन्ह प्रदान करून खासदार राहुल शेवाळे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

खासदार राहुल शेवाळे म्हणाले, मी माझ्या मनगटाच्या बळावर स्वतंत्र राज्य मिळवून रयतेचा राजा होणार. हा स्वाभिमानाचा, आत्मसिश्वासाचा हुंकार त्यापूर्वी तीनशे वर्षे महाराष्ट्र भूमीवर उमटला नव्हता तो शिवाजी महाराजांच्या रूपाने प्रगट झाला.स्वराज्य स्थापन केले आणि ते सुराज्य कसे होईल याकरता ते सतत प्रयत्नशील राहिले. शिवाजी राजांचे कार्य हे आपले आहे असे त्या वेळच्या मावळ्यांना आणि रयतेला वाटत होते त्यामुळे नरवीर तानाजी, बाजी, शिवा काशीद यांनी लढताना आत्मसमर्पण केले. शिवाजी महाराज हे वारसा हक्काने राजे बनले नव्हते ते त्यांनी स्वतः एक राज्य निर्माण केले. त्यामुळे ते केवळ महाराष्ट्राचे नव्हे तर साऱ्या राष्ट्राचेच नेते होते.

यावेळी रवींद्र मालुसरे यांनी नरवीर तानाजी मालुसरे यांच्या इतिहासाचा मागोवा घेताना म्हणाले की, पुरंदरच्या तहानंतर राजांच्या कल्पनेतला भूगोल बिघडला होता, परंतु तानाजी मालुसरे यांनी कोंढाण्याच्या लढाईत महापराक्रम केला, स्वतः धारातीर्थी पडले गड जिंकला आणि त्या इर्षेतून पुढेमावळ्यांनी गेलेले सर्व किल्ले पुन्हा जिंकले. आणि छत्रपतींचा राज्याभिषेक झाला. महाराजांचा हा इतिहास कॉन्व्हेंट मध्ये शिक्षण घेतलेल्या आपल्या मुलांना सांगितला पाहिजे, मराठीतून त्यांना वाचायची सवय लावली पाहिजे. अन्यथा आपण शिवाजी महाराज की आणि मुले फक्त ‘जय’ म्हणतील.

कर्मचारी संघाचे जनरल सेक्रेटरी संदीप कदम यांनी या उपक्रमाचे नियोजन केले. आर सी एफ महिला मंचच्या वतीने पारंपरिक वेषभूषेसह लेझीम नृत्य करीत महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवले. सूत्रसंचालन शिवप्रसाद कांबळे यांनी केले.