बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे शिवजयंती उत्सव संपन्न

महाराष्ट्र

मुंबई: हिंदवी स्वराज्याची स्वबळावर निर्मिती करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९३ व्या जयंतीनिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे आयोजित ‘शिवजयंती उत्सव’ छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) येथील छत्रपती शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्यास महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते (दि. १९) फेब्रुवारी २०२३ पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी स्थानिक आमदार सदानंद सरवणकर, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, राज्यपालाचे प्रधान सचिव संतोष कुमार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष किसन जाधव, सरचिटणीस संजय शेटे, उप आयुक्त (परिमंडळ – २) रमाकांत बिरादार, उप आयुक्त (वित्त) रामदास आव्हाड, जी/उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळे, महानगरपालिका सचिव (प्र.) संगीता शर्मा आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) वर झालेल्या मुख्य समारंभात महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या स्नॉर्कल (शिडी) च्या सहाय्याने माननीय राज्यपाल रमेश बैस, स्थानिक आमदार सदानंद सरवणकर व बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल या मान्यवरांनी शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यानंतर छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) मधील क्रीडा भवन येथे सकाळच्या प्रसन्न वातावरणात छोटेखानी सांस्कृतिक समारंभ झाला. त्यात माननीय राज्यपाल रमेश बैस यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल हे अध्यक्षस्थानी होते. महानगरपालिका आयुक्त व प्रशासक इकबाल सिंह चहल यांच्या हस्ते माननीय राज्यपाल रमेश बैस यांचे पुष्‍पगुच्‍छ देऊन स्‍वागत करण्यात आले.

महापालिकेच्या संगीत व कला अकादमीच्या चमूने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित गौरवपर मराठी गीते सादर केली. माननीय राज्यपाल रमेश बैस यांनी संगीत व कला अकादमीच्या चमूने उत्‍कृष्‍ठ गीते सादर केल्‍याबद्दल संगीत व कला अकादमीचे कौतुक केले. चहापानानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.

भारताचे प्रवेशद्वार (गेट वे ऑफ इंडिया) येथे ही अभिवादन…

भारताचे प्रवेशद्वार (गेट वे ऑफ इंडिया) येथे सकाळी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीतर्फे आयोजित समारंभास विधानसभा अध्यक्ष तथा स्थानिक आमदार अँड. राहुल नार्वेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळाला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

याप्रसंगी उप आयुक्त (परिमंडळ -६) देविदास क्षीरसागर, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष किसन जाधव, सरचिटणीस संजय शेटे हे मान्यवर उपस्थित होते. शिवजयंती उत्सवानिमित्त सकाळी ७ ते ९ या वेळेत चौघडा व सनई वादनाने वातावरण प्रफुल्लित झाले. त्यानंतर शिव छत्रपती मंडळाच्या सुहासिनींनी शिवरायांची आरती सादर केली.