मुंबईतील १ मे रोजीच्या वज्रमूठ सभेसाठी काँग्रेसची जय्यत तयारी;  नाना पटोले

महाराष्ट्र

टिळक भवनमध्ये कोकण विभागातील पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक संपन्न…

मुंबई: महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभा राज्यभर होत असून छत्रपती संभाजीनगर व नागपूर येथील सभेनंतर तिसरी सभा मुंबईत होत आहे. दोन्ही सभेला जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता आता मुंबईतील सभेच्या तयारीसाठी प्रदेश काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली असून मुंबईतील सभेच्या तयारीचा आढावा यावेळी घेण्यात आल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे छत्रपती संभाजी नगर व नागपूरच्या सभेला उपस्थित होते. अजित पवार नागपूरच्या सभेला उपस्थित राहणार नाहीत असे चित्र प्रसार माध्यमात रंगवण्यात आले होते पण वस्तुस्थिती जनतेने पाहिली आहे. मविआची वज्रमूठ सभा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांची एकत्रित सभा असून या सभेला राज्यातील तीन्ही पक्षांचे नेते उपस्थित असतात.

मुंबई येथे १ मे २०२३ रोजी होणा-या वज्रमूठ सभेच्या पूर्वतयारीसाठी टिळक भवन, दादर येथे प्रांताध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान व चंद्रकांत हंडोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस प्रमोद मोरे, राजेश शर्मा, प्रदेश प्रवक्ते डॉ, राजू वाघमारे यांच्यासह ठाणे शहर व ग्रामीण, भिवंडी शहर, कल्याण शहर, उल्हासनगर शहर, वसई विरार शहर, मिरा भाईंदर शहर, नवी मुंबई शहर, पनवेल, रायगड, पालघर व मुंबई जिल्ह्यातील काँग्रेस जिल्हा प्रभारी, जिल्हाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, आघाडी संघटना, विभाग व सेलचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.