पुण्यात पोलीस, पत्रकारांच्या सतर्कतेनेमुळे वाचले आईसह दोन चिमुकल्यांचे प्राण…

महाराष्ट्र

पुणे: कौटुंबिक भांडण आणि दारुडा नवऱ्याच्या सततच्या जाचाला कंटाळून खडकवासला धरण चौपाटीवर स्वतःच्या दोन मुलांसह आत्महत्या करण्यासाठी आलेल्या एका युवतीचे प्राण धरणावरील एका व्यवसायिक महिलेच्या, पोलिस आणि पत्रकाराच्या सतर्कतेमुळे वाचले आहेत.

महिलेला पोलीस ठाण्यात आणून तिच्या नवऱ्यास समज देऊन पाठवण्यात आले. धरण चौकातील वाहतूक पोलीस आणि पत्रकाराने तात्काळ घटनास्थळी पोहोचून युवतीस आत्महत्या करण्यापासून परावर्तीत केले.

सकाळी 11:30 वाजताच्या दरम्यान खडकवासला धरण चौकातील पुणे ग्रामीण पोलिस दलातील वाहतूक पोलीस विलास बांबळे वाहतूक नियंत्रित करत होते तर स्थानिक पत्रकार विशाल भालेराव नेहमीप्रमाणे या रस्त्याने प्रवास करत होते.

धरण चौपाटीवर स्टॉल धारक रंजना जाधव, काजल बडदे यांची स्टॉल लावून ग्राहकांच्या ऑर्डर देण्याची लगबग चालू असताना काजल बडदे या स्टॉलधारक महिलेचा पोलिसांना फोन आला. एक युवती आपल्या लहानग्यांच्या हाताला दोरी बांधून आत्महत्या करत आहे. त्यानंतर माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

30 वर्षाची युवती तिच्या सात वर्षाची गोंडस मुलगी तर कडेवर असलेले एक वर्षांचे बाळ यांसह आत्महत्या करण्याच्या तयारीने आली होती. घरात झालेल्या भांडणामुळे हा टोकाचा पाऊल उचलत असल्याचे समोर आले आहे. घटनास्थळी नागरीक पोलीस आणि पत्रकार यांनी सदर युवतीशी संपर्क साधत आवाहन करुन आत्महत्येपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान शंभर नंबरहून पोलिसांनाही संपर्क साधण्यात आला असल्याने पोलिसही तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि महिलेसह दोन चिमुकल्यांचा जीव वाचला. “कुटुंबात झालेल्या वादातून महिला टोकाचे पाउल उचलत आहेत. हे सामाजिक मागासलेपणाचे लक्षण आहे. महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळाल्यास आणि स्वावलंबी झाल्यास अशा घटना कमी होतील. घडलेल्या वादातून आत्महत्या करणे हा अंतिम उपाय नाही. असे मत हवेली पोलीस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक शीतल ठेंबे यांनी सांगितले.