हिवरे कुंभारच्या शेतकरी रुग्णाला सरपंच व आमदारांचा आधार

शिरूर तालुका

सरपंच शारदा गायकवाड व आमदार अशोक पवारांमुळे नऊ लाख माफ

शिक्रापूर (शेरखान शेख): हिवरे कुंभार (ता. शिरुर) येथील एका शेतकऱ्याचा अपघात झालेला असताना हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर तब्बल 12 लाख रुपये खर्च आलेला असताना सरपंच शारदा गायकवाड यांच्या मुळे आमदार अशोक पवार यांच्यामुळे सदर रुग्णाचे हॉस्पिटलचे 9 लाख रुपये बिल माफ झाल्याने शेतकरी गरीब रुग्णाला महिला सरपंच व आमदारांचा मोठा आधार मिळाला आहे.

हिवरे कुंभार (ता. शिरुर) येथील शेतकरी कुटुंबातील बाजीराव मांदळे हे 15 दिवसांपूर्वी वाघोली येथे गेलेले असताना त्यांचा अपघात झाला आणि त्यांच्या मेंदूला मार लागला. मांदळे यांच्या कुटुंबीयांनी त्यांना उपचारासाठी पुणे येथील जहांगीर हॉस्पिटल येथे दाखल केले. उपचार सुरु असताना नातेवाइकांनी काही रक्कम हॉस्पिटलमध्ये जमा केली.

मात्र पुढील रक्कम भरणार कशी हा प्रश्न नातेवाईकांपुढे असताना सरपंच शारदा गायकवाड यांनी हॉस्पिटलमध्ये जात रुग्णाच्या तब्बेतीची विचारपूस करत धीर देऊन आपण मदत करु असे सांगितले, मांदळे यांच्यावर उपचार झाल्यानंतर तब्बल 12 लाख रुपये पूर्ण बिल झालेले असताना नातेवाईकांनी 3 लाख रुपये बिल भरलेले होते. त्यामुळे उर्वरित बिल भरायचे कसे हा सर्वांसमोर प्रश्न असताना सरपंच शारदा गायकवाड यांनी आमदार अशोक पवार यांना फोन करुन सर्व हकीगत सांगितली.

त्यांनतर आमदार अशोक पवार यांनी स्वतः हॉस्पिटलमध्ये येत रूग्णासह त्याच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना धीर देत हॉस्पिटल प्रशासनाला सांगून या शेतकरी कुटुंबातील रुग्णाचे तब्बल 9 लाख रुपये बिल माफ केले. बाजीराव मांदळे व त्यांच्या कुटुंबियांना सरपंच शारदा गायकवाड व शिरुर हवेलीचे आमदार अशोक पवार यांचा मोठा आधार मिळाला आहे.