युवावर्गातील मित्र-मैत्रिणींशी त्यांच्या भविष्यातील वाटचालीबाबत संवाद साधल्याचे समाधान

महाराष्ट्र

मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींनी आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर इथे आदरणीय शरद पवार यांची भेट घेतली. युवावर्गातील मित्र-मैत्रिणींशी त्यांच्या भविष्यातील वाटचालीबाबत संवाद साधल्याचे समाधान शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केले.

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला जेव्हा पुण्यात भेट दिली त्याचवेळी मुख्यमंत्री व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या प्रमुख अधिकाऱ्यांशी चर्चा केली असे शरद पवार म्हणाले. या दोघांशी संवाद साधल्यानंतर त्यातून मार्ग निघेल अशी खात्री झाली. यात श्रेय कोणी घ्यायचे हा माझ्यादृष्टीने विषय नाही. यात दोघांनीही सहकार्य केले, असे स्पष्ट मत शरद पवार यांनी व्यक्त केले.

विद्यार्थ्यांच्या या भेटीनंतर शरद पवार यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तरे दिली. मतदार कुठे गेले असतील तर त्यांनी निवडणुकीसाठी यावे, असे आवाहन करण्यात चुकीचे नाही. जर मतदार नसेल तर त्यासंबंधी हरकत घेणे योग्य आहे. एखाद्याच्या भाषणावर हरकत घेणे म्हणजे कळत-नकळतपणे त्याला जातीय रंग देण्याचा हा प्रयत्न आहे असा थेट हल्लाबोल शरद पवार यांनी भाजपने घेतलेल्या आक्षेपावर केला.

ज्यावेळी यशासंबंधी शंका तयार होते तेव्हा जात,पात,धर्म या चुकीच्या गोष्टींकडे आपला प्रचार वळवण्याचे काम भाजपसाठी नवे नाही. यापूर्वीही असे अनेकदा झाले आहे याची आठवणही शरद पवार यांनी करुन दिली.

कसब्यामध्ये मिळालेली माहिती जरी अधिकृत नसली तरी, या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाकडून जे अर्थकारण होतंय ते यापूर्वी कधी बघितले नाही असे लोक सांगतात. याचा अर्थ कोणत्याही टोकाला जाऊन ही निवडणूक हातात घ्यावी, असे चित्र सत्ताधारी लोकांचे असावे असे सांगतानाच भाजपमधले सगळेच लोक आवडण्यासारखे आहेत असे मला वाटत नाही. इतकी वर्षे मी भाजपवाल्यांना बघत आहे, त्यांना युतीत यावे असे वाटत नाही. त्यामुळे माझ्याबाबत होणारी विधाने ही अतिशय पोरकट आहेत, असे प्रत्युत्तर शरद पवार यांनी दिले.

सरकार चालवून लोकांना विश्वास देणे आणि विकासाच्या कामाला गती देणे, असे कोणतेही काम सरकारकडून होत नसल्यामुळे इतर गोष्टींकडे लक्ष वेधण्यासाठी विविध विषय काढले जातात असा थेट आरोपही शरद पवार यांनी यावेळी केला.

कापूस आणि सोयाबीन या दोन क्षेत्रांची स्थिती अतिशय गंभीर आहे. हे पीक घेणाऱ्या काही भागाचा दौरा केला असता तेथील स्थानिक लोकांच्या अतिशय तीव्र भावना पाहायला मिळाल्या. सगळ्यांच्या घरात कापूस आहे, मात्र मार्केट नाही, आयात सुरू आहे. सोयाबीन, कांद्याची स्थितीही अशीच आहे.

राज्यसरकारने उत्पादन वाढीला प्रोत्साहन देण्याची नीती घ्यायला हवी. तीन घेता दुर्दैवाने या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जातेय. केंद्र आणि राज्य सरकारने याबाबत पावले टाकण्याची आवश्यकता असतानाही ते टाकत नाहीत. याचे परिणाम येणाऱ्या निवडणुकांमध्ये दिसतील असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.