नागपूर: महाराष्ट्र सरकारने नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून करण्यात आलेल्या हत्येतील आरोपीला फाशीची शिक्षा देण्यासंदर्भात या अधिवेशनात कठोर पाऊले उचलली गेली नाही तर आपण त्या लहानग्या मुलीला न्याय देऊ शकणार नाही अशा शब्दात आमदार सना मलिक-शेख यांनी सभागृहात खंत व्यक्त केली.
नाशिक जिल्हयातील मालेगाव येथील अल्पवयीन मुलीवर झालेला अत्याचार आणि हत्या प्रकरणावर लक्षवेधीच्या चर्चेदरम्यान अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सना मलिक-शेख यांनी सहभाग घेत सभागृहाचे लक्ष वेधले.
आमदार सना मलिक – शेख यांनी १९८० मध्ये पंजाबमधील बच्चन सिंग यांच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने दिलेल्या फाशीच्या शिक्षेचा संदर्भ देताना महाराष्ट्र सरकारने आरोपीला त्याचा गंभीर गुन्हा लक्षात घेता फाशीची शिक्षा देण्यासंदर्भात जलदगती न्यायालयात हे प्रकरण घेऊन चालवावे आणि संबंधित आरोपीला फाशीची शिक्षा तात्काळ मिळावी अशी मागणी केली.
आमदार सना मलिक – शेख यांनी मांडलेल्या गंभीर विचारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात लेखी निवेदनाद्वारे उत्तर सादर केले. त्यामध्ये आरोपीवर १७-११-२०२५ रोजी गुन्हा दाखल करुन अटकही करण्यात आली आहे. या प्रकरणात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवाय हा खटला जलदगती न्यायालयात वर्ग करण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाचे महाप्रबंधक यांना विधी व न्याय विभागामार्फत विनंती करण्यात आली आहे. दिनांक ८ डिसेंबर २०२५ रोजी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. शिवाय राज्यातील बालकांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी ६ प्रकारच्या उपाययोजना करण्यात आल्याचे लेखी निवेदनाच्या उत्तरात म्हटले आहे.