पत्रकार शशिकांत वारीशे यांचा अपघात नसून घातपात!

महाराष्ट्र

गुन्हेगारांवर कठोर कारवाई व्हावी, संपूर्ण प्रकरणाची चौकशी होऊन सुत्रधारावरही कारवाई व्हावी…

मुंबई: अन्यायाविरुद्ध लढणारा पत्रकार म्हणून ओळखले जाणारे दै. ‘महानगरी टाईम्स’चे झुंजार पत्रकार शशिकांत वारीशे यांची सुनियोजित हत्या करण्यात आली असून या हत्येचा एनयुजेमहाराष्ट्र तीव्र शब्दात निषेध करीत आहे. वारीशे हे सातत्याने रिफायनरी विरोधी जनमताचा आवाज बुलंद करीत होते. त्यांची शेवटची बातमी (दि. ६) फेब्रुवारी, २०२३ च्या ‘महानगरी टाईम्स’मध्ये प्रसिद्ध झाली होती.

आंगणेवाडी यात्रेनिमित्त पंतप्रधान मोदींसह राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या बॅनरवर गंभीर गुन्ह्यातील आरोपीचे फोटो असल्याची ती बातमी होती. तो आरोपी म्हणजे रिफायनरी प्रस्तावित होऊ शकणार्‍या भागात जमिनींचे व्यवहार करणारा पंढरीनाथ आंबेरकर होय. याच आंबेरकरने सोमवारी दु. १ वाजता राजापूर महामार्गावरील पेट्रोल पंपावर वारीशे यांना पाहिले. त्यानंतर बेसावध असलेल्या वारीशे यांच्या दुचाकीवर आपले वाहन चढवून त्यांची हत्या केली, असा आरोप आहे.

वारीशे यांना आधी रत्नागिरी येथे आणि नंतर बेशुद्धावस्थेत कोल्हापूर येथे हलविण्यात आले. ते पुन्हा शुद्धीवर आलेच नाहीत. (दि. 7) रोजी सकाळी ७ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. वारीशे यांची हत्या म्हणजे लोकशाहीवरचा निर्घृण हल्ला आहे. अशाप्रकारे सुनियोजित पध्दतीने भर दिवसा पत्रकारांची हत्या होणे ही कोणा एका व्यक्तीचे धाडस असू शकते का? यामागे असणाऱ्या सूत्रधारांचा शोध लावून त्यांनाही शासन होणे आवश्यक आहे. संबंधित आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, तसेच या अशा खुनशी प्रवृत्तींना वेसण घालणे अत्यावश्यक आहे, अशी मागणीएनयुजेमहाराष्ट्र ने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना केली आहे.

शीतल करदेकर

(अध्यक्ष)

नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्स महाराष्ट्र