body

शिरूर तालुक्यात शेतकऱ्याचा विहीरीत पडून मृत्यू…

क्राईम

टाकळी हाजी (अरुणकुमार मोटे): चांडोह (ता. शिरूर) येथील शेतकरी भानुदास गणपत गाडगे हे आज (शुक्रवार) पहाटे ५:३० वाजण्याच्या सुमारास शेतातील कांदयाला पाणी देण्यासाठी गेला असताना शेतातील विहीरीत पडून त्याचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

या बाबत सविस्तर माहिती अशी की, चांडोह (ता. शिरूर) येथे भानुदास घाडगे यांची शेतजमिन गट नं. ५८/१/अ मध्ये तीन एकर शेत जमीन आहे. शेतामध्ये त्यांनी कांदा पिक घेतले असून आज पहाटे ५ : ३० वाजता ते शेतातील कांद्याला पाणी देण्यासाठी गेले होते. ते लवकर घरी न आल्याने त्यांचा मुलगा संजय भानुदास गाडगे हा त्यांना पाहायला शेतात गेला असता त्याला शेतातील विहीरीजवळ बॅटरीची लाईट एका जागेवर दिसत असल्याने तो विहीरीवर गेला. तेव्हा त्याला त्याचे वडील दिसले नाही.

संजयने बॅटरीच्या लाईटने विहीरीमध्ये पाहीले असता त्याला वडीलांची चप्पल पाण्यामध्ये तरंगत असलेली दिसली. नंतर त्याने आजूबाजूच्या नागरिकांना फोन करून सदर ठिकाणी बोलावून घेतले. गावातील लोकांच्या मदतीने त्याने वडीलांचा विहीरीत शोध घेतला असता त्याचे वडील पाण्यामध्ये मयत अवस्थेत मिळून आले. त्यांना पोहता येत नसल्याने त्यांचा पाय घसरुन विहीरीत पडून पाण्यात बुडुन मयत झाले असावेत. त्यांच्या मरणाबाबत कोणाविरुद्ध काही एक तक्रार अथवा संशय नसल्याचा जबाब मयताचा मुलगा संजय भानुदास गाडगे यांनी शिरुर पोलिस स्टेशनला दिला आहे.