रोहित्र जळाल्यास शेतकऱ्यांनी नियंत्रण कक्षाला फोन करावा…

महाराष्ट्र

बारामती: रब्बीच्या हंगामात शेतीपंपाच्या वीज मागणीत जशी वाढ होते तसा महावितरणच्या वीज यंत्रणेवर ताण येतो. परिणामी अतिभारामुळे रोहित्र जळतात. मागील ७० दिवसांत ३२७० रोहित्र जळाले होते. त्यातील ३२४० रोहित्र महावितरणने तातडीने बदलले. आता फक्त ३० रोहित्र बदलणे बाकी आहे. रोहित्र तातडीने बदलता यावे यासाठी शेतकऱ्यांनी रोहित्र नादुरुस्त होताच कंपनीच्या कंट्रोल रुमला फोन करावे, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे.

बारामती परिमंडल कार्यालयांतर्गत महावितरणची सातारा, सोलापूर व बारामती असे तीन मंडल कार्यालये आहेत. सोलापूर मंडलात ५५१०४, सातारा ३०६१७ व बारामती मंडलात ३९२२५ रोहित्र आहेत. सरासरी ७.४४ टक्के रोहित्र वर्षभरात नादुरुस्त होतात. अनाधिकृत वीज भार, कॅपॅसिटरचा वापर टाळणे ही रोहित्र जळण्याचे प्रमुख कारणे आहेत. रब्बी हंगामात सर्वाधिक रोहित्र जळतात.

गेल्या डिसेंबरपासून फेब्रुवारीच्या ८ तारखेपर्यंत (७० दिवस) परिमंडलात सोलापूर १६६३, सातारा ५७६ तर बारामती मंडलात १०३१ अशी एकूण ३२७० रोहित्र जळाली आहेत. यातील केवळ ३० रोहित्र बदलणे बाकी आहे. जळालेले रोहित्र तातडीने बदण्यासाठी महावितरण प्रयत्नशील असून, रोहीत्र जळताच शेतकऱ्यांनी स्थानिक पातळीवर किंवा जिल्हा पातळीवर कार्यरत असलेल्या दैनंदिन नियंत्रण कक्षाला (कंट्रोल रुम) फोन करावा. जेणेकरुन संबंधित रोहित्र तातडीने बदलणे शक्य होईल. नियंत्रण कक्षाचे क्रमांक सोलापूरसाठी ९०२९१४०४५५, सातारा ९०२९१६८५५४ व बारामती करिता ७८७५७६८०७४ असे आहेत. या क्रमांकावर शेतकऱ्यांनी फोन केल्यास रोहित्र बदण्यासाठी त्वरित उपाययोजना केल्या जातील.

कॅपॅसिटरचा वापर करा: रोहित्र व कृषीपंप वाचवायचे असतील तर कॅपॅसिटरचा वापर करणे हा किफायतशीर उपाय आहे. कॅपॅसिटरमुळे वीजभार कमी होतो. मोटारीचे कंपन कमी होते. पाण्याचा विसर्ग वाढतो. रोहित्र व कृषीपंपाची कार्यक्षमता व आयुर्मान सुधारते. वितरण हानी टळून शेतकरी व कंपनी दोघांचाही फायदाच होतो व गैरसोयही टळते.