नेते आवरा हो स्वतःला!…जनतेसाठी काम करा, स्त्री सन्मानाच्या चिंधड्या होत आहेत…

महाराष्ट्र

मुंबई: आपल्या देशात कधी झाला नाही इतका मोठ्या प्रमाणात समाजमाध्यमांचा उपयोग वर्तमानात होताना दिसतो .२०१४ पासून या समाज माध्यमांचा उपयोग  आपल्या विरोधी पक्षाना नामोहरम करण्यासाठी करण्याचे काम भारतीय जनता पक्षाने सुरू केले. समाज माध्यमातून आपली स्वतःची आयटी सेल, ट्रोलर तयार केले. त्यानंतर मग सगळेच राजकीय पक्ष समाज माध्यमातून आपली ही लढाऊ सैन्य तयार करू लागले आणि या माध्यमातून कितीही खालच्या पातळीवर जाऊन बोलले लिहिले तरी कोणी काहीच करू शकत नाही असा एक समज तयार होऊ लागला . सत्ताधारी पक्ष आपल्या सोयीने  सायबर सेलचा वापर करताना दिसू लागला. गुन्हा कोणावर नोंदवावा कधी नोंदवावा आणि कधी नोंदवूच नये, तक्रार घेऊन नये हेही वादाचे झाले.

भाजप -शिंदे सरकार सत्तेत आल्यावर ज्याप्रकारे माध्यमातून युद्ध सुरू झाले आहे एकमेकांवर आरोप -प्रत्यारोप होत आहेत. अभद्र भाषेचा वापर समाज माध्यमातून होत आहे हे पाहता आपण   पुरोगामी  की सनातनी आहोत यापेक्षा किमान माणूस  म्हणून जगण्यास लायक आहोत का हा प्रश्न पडलेला आहे. जर आपण सनातनी म्हणजे देवधर्म मानून इतरांना माणसाप्रमाणे जगू द्यायचं असं मानत असू तर कोणता देव, अल्ला सांगतो की महिलांना शिव्या द्या? महिलांना मारा, कशीही भाषा वापरले तरी  देव अल्ला सगळं माफ करतो. आणि जर आम्ही पुरोगामी असू तर आमच्या शिवाजी महाराजांनी  स्त्री  आदर काय आहे याचे उदाहरण  कृतीतून दिलेले आहेच. शाहू फुले आंबेडकरांचे नाव जर घेणार असू तर स्त्री सक्षमीकरणासाठी शिक्षणासाठी या महान लोकांनी काय केलं याचं ज्ञानही आपल्याला असायलाच पाहिजे. मात्र सत्ताधाऱ्यांपासून ते विरोधकांपर्यंत सगळेच सत्तेसाठी हाणामाऱ्या करतायेत ,वर्चस्वासाठी काय काय करतायेत हे पाहताना कुठेतरी हे थांबलं पाहिजे ! जनतेला न्याय मिळाला पाहिजे असं लोकमत मोठ्या प्रमाणात तयार  झाले आहे.

ठाण्यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या मीनाक्षी शिंदे यांना एका मेसेजसाठी जी मारहाण झाली, त्यानंतर जे रान उठले, ठाण्यातील ठाकरे गटाच्या  कार्यकर्तीला शिंदे गटाच्या महिलांनी दमदाटी केली.  एका पत्रकाराला मुख्यमंत्री शिंदे यांचा पीए म्हणवणाऱ्या राहुल लोंढे यांनी दमदाटी केली. प्रवक्ते मस्के हेही  दमदाटी करतात !त्यांच्यावर काहीच कारवाई झाली नाही. फेसबुक ट्विटर युद्ध रस्त्यावर आले,  त्यात पोलीस हतबल झाले.पीडित महिलांची सुरक्षेसाठी तक्रार घेण्याची मागणीही पोलीस वरिष्ठांच्या दबावामुळे टाळू लागले ! गृहखाते कोणाच्या दावणीला बांधले आहे काय? हा प्रश्न जनता विचारतेय.

अरे हो , शिवसेनेच्या सुषमा अंधारे यांच्याबद्दल  मंत्री संजय शिरसाठ यांनी जाहीर वक्तव्य केले, त्यांना त्याबद्दल साधी दिलगिरी ही व्यक्त करावीशी वाटली नाही; याबद्दल मुख्यमंत्री  वा गृहमंत्री चकार शब्द बोलले नाहीत. हा कोणता राजधर्म ? याचे उत्तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देत नसतील आणि जनतेच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत असतील तर राज्याचे पालक म्हणून नव्याने आलेले राज्यपाल  मा रमेश बैस यांनी या प्रकरणाची गंभीरपणे दखल घ्यायला हवी. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम  गोऱ्हे, यांनी अनेक विषयांमध्ये महिलांच्याबाबत भूमिका घेऊन विषय मार्गी लावण्याचे प्रयत्न केलेत. मात्र राज्यामध्ये जे काही महिला सुरक्षेबाबत अराजकी वातावरण तयार झाले आहे. पुरुष नेते कशाही प्रकारे बोलत आहेत ! महिला कार्यकर्त्या एकमेकांशी हाणामारी करत आहेत ,हे चित्र भयावह असे आहे. येणारा काळ महाराष्ट्रात आणखी मोठ्या प्रमाणात अराजकी माजेल की काय अशी भीतीही वाटू लागलेली आहे.

लोकप्रतिनिधी म्हणून आपण ज्यांना निवडून देतो असे खासदार आमदार आपल्याहाती आणि इतर माध्यम आहेत म्हणून थेट प्रक्षेपणात गुंडगिरीची भाषा करू लागले आहे अर्वाच्च्य शब्द वापरू लागले, एकमेकांवर बेताल आरोप करत आहेत हे पाहताना, हीच सगळे माणसं पूर्वी एकत्र काम करत होती तिच मग आता वर्चस्वाच्या लढाईत एकमेकांचे कपडे फाडत असताना जनतेचा वेळ आणि पैसा का वाया घालवत आहेत? असा प्रश्न आम्ही विचारतोय…आणि जर सत्ताधारी प्रशासक आणि विरोधक यांच्यात सातत्याने तुंबळ वाद होत असतील आणि प्रकरण हातघाईपर्यंत  येत असेल  तर राज्याचे पालक म्हणून राज्यपाल महोदयांनी याकडे स्वतःहून लक्ष देऊन सर्वपक्षीयाना बोलवून महिलांच्या विषयाकडे लक्ष वेधले पाहिजे.

शिवरायांच्या या महाराष्ट्रात चाललेली चिखलफेक थांबायला हवी .सर्वपक्षीय महिला नेत्या, पत्रकार ,सामाजिक कार्यकर्ते यांना एकत्र करून महिलांसाठी काम करणाऱ्या विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलमताई  गोर्‍हे यांच्या नेतृत्वात सुसंवाद व्हावा. ही रस्त्यावरची मारामारी, पक्षीयताकद, गटाचे वर्चस्व  दाखवण्याची गुंडागिरी थांबवून सर्वसामान्य कार्यकर्ते, सर्वसामान्य जनता आणि महिला यांचे जगणे सुरक्षित व्हावे म्हणून काही नियमावली आणि काही सूचना गृह विभागाला पोलीस खात्याला देण्याची गरज आहे.

…आणि हो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्याकडे महिला बालकल्याण विभाग आहे असे मंत्री मंगल प्रभात लोढा यांची भूमिका ही यात महत्त्वपूर्ण  असायला हवी होती. मात्र एकूणच विषयात ते काहीही बोलताना दिसत नाही आणि म्हणून महिला बालकल्याण विभागाला अभ्यासू सर्वसामावेशक आणि पक्षापलीकडे जाऊन काम करणारी महिला मंत्री मिळाली तर उत्तम होईल. आपापसात भांडणारी हे लक्षात ठेवायला पाहिजे की आपण लोकांसाठी काम करतोय आणि  स्त्रीसन्मानाच्या बाता मारताना आपण महिलांवरच अन्याय करत असू;   अभद्र भाषा बोलत असून तर अशा नेत्यांना मंत्र्यांना एक क्षणही त्या पदावर राहण्याचा अधिकार नाही.

गृह खात्याची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे, असे कार्यक्षम उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस हे तर प्रचंड स्त्रीस्वातंत्र्यवादी भूमिकेचे आहेत. त्यांनी आपल्या पत्नीला स्वतःचं करिअर करण्यासाठी स्वातंत्र्य दिलेले पाहता अनेकजण अचंबित झाले होते. मात्र तेच गृहमंत्री स्त्री सन्मानाच्या बाबतीत महिलांचा अपमान होत असताना, शिवीगाळ होत असताना हाणामारी होत असताना कोणतीही कृती करताना, समजावणीचा शब्द बोलताना दिसत नाही ही अत्यंत गंभीर अशी गोष्ट नक्कीच नमूद करावीशी वाटते.

या विषयावर खूप काही लिहिता येईल पण सध्याच्या घडीला प्रत्येक जण हिरीरीने पेटला आहे की, आम्हीच कसे खरे, आम्हीच म्हणजे कडवे हिंदुत्ववादी, कडवे सनातनी, कडवे पुरोगामी …या सगळ्यात  किमान महिलांना सन्मानाने जगता याव, पत्रकारांना सन्मानाने जगता याव. अभिव्यक्ती करताना आणि जगताना किमान माणूस म्हणून त्यांना जगता याव इतके वातावरण असावं आणि राजकारणात महिलांनी काम करण्यासाठी पुढे यावं इतकी माणुसकी सगळ्यांनीच जोपासायला हवी