महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विद्यार्थी हितासाठी अहंकार बाजूला ठेवावा…

महाराष्ट्र

नागपूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून होणाऱ्या परीक्षा देऊन प्रशासनात अधिकारी होण्याचे स्वप्न अनेक विद्यार्थी पहात असतात. दरवर्षी लाखो विद्यार्थी आयोगाच्या परिक्षेसाठी अहोरात्र मेहनत घेतात. आयोगाने परिक्षा पद्धतीत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर बदल करुन तो २०२३ पासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या बदलाचे आकलन करण्यास विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळावा यासाठी ही नवीन पद्धत दोन वर्षांनी म्हणजे २०२५ पासून लागू करावी. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आपला अहंकार बाजूला ठेवावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगासंदर्भात विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांच्या पुढाकाराने विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सामान्य प्रशासन विभागाचे अप्पर मुख्य सचिव नितीन गद्रे, काँग्रेस आ. वजाहत मिर्झा, लोकसेवा आयोगाच्या सचिव सुवर्णा खरात तसेच माजी सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी हे दूरदृश्य प्रणालीदवारे उपस्थित होते.

अतुल लोंढे पुढे म्हणाले की, कोरोनामुळे दोन वर्षे विद्यार्थांचे मोठे नुकसान झाले आहे. परिक्षांची तयारी करण्याबरोबरच विद्यार्थ्यांना या परिक्षासंदर्भातील अनेक समस्यांनाही तोंड द्यावे लागत आहे. ऑगस्टपासून परीक्षा पद्धतीत बदल केला आहे, हा बदल आत्मसात करण्यासाठी विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळणे आवश्यक आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग ही स्वायत्त संस्था आहे, या संस्थेने विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेतले पाहिजे. एमपीएससीसाठी प्रयत्न करणाऱ्यांमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. दोन वर्षांनंतर नवीन पद्धतीने परिक्षा घेतल्या तर त्याचा फायदा या विद्यार्थ्यांना होऊ शकेल याचा सकारात्मक विचार करावा.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर केलेल्या बदलानुसार अभ्यास करण्यास एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना वेळ मिळाला पाहिजे. या नवीन पद्धतीने एमपीएससीच्या परिक्षा २०२३ पासूनच घेतल्या तर त्याचा फायदा केंद्रीय लोकसेवा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्त होईल व एमपीएससीची तयारी करणाऱ्यांचे नुकसान होऊ शकते. असे मुद्दे लोंढे यांनी मांडले असून एमपीएससी संदर्भातील लढ्यात काँग्रेस पक्ष विद्यार्थ्यांसोबत असल्याचे त्यांनी सांगितले.