नागपूरात नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट नावाचे आरोग्य मंदिर उभारणारा देवदूत…

महाराष्ट्र

नागपूर: आज नागपूरहुन मुंबईकडे परतीच्या प्रवासाला निघताना ठरवूनच नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटला भेट दिली. मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आणि उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब या जोडगोळीच्या संकल्पनेतुन साकारलेल्या आणि महाराष्ट्राची भाग्यरेषा ठरत असलेल्या समृद्धी महामार्ग सुरू होण्याअगोदर उजव्या बाजूला आंतरराष्ट्रीय दर्जाची भव्य अशी इमारत नजरेस पडते. होय, ही इमारत म्हणजेच आजचं आरोग्य मंदिर झालेलं नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट.

सर्वश्री डॉ शैलेश जोगळेकर यांनी अक्षरशः दिवसरात्र एक करुन डॉ मालिनी जोशी, डॉ डी के शर्मा यांच्यासारख्या असंख्य सहकाऱ्यांच्या साथीने हे आरोग्य मंदिर उभरलय. एखाद्या तपस्वीने जगाच्या उद्धारासाठी महायज्ञ करावा, आणि या यज्ञात जगाच्या कल्याणासाठी स्वतःची आहुती द्यावी या पद्धतीने नागपूर मधील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट नावाचं मंदिर या सर्व डॉक्टर मंडळींनी अखंड मेहनतीतुन उभारलय.

पण अर्थातच हे आरोग्य मंदिर उभारण्याचं, ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचं काम राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी केलं. नागपूर म्हणजे देशाचा मध्यबिंदू. महाराष्ट्र राज्यासह लगतच्या इतर अनेक हिंदी भाषिक राज्यातील गोर गरीब रुग्ण उपचारासाठी नागपुरात येतात. यात दिवसेंदिवस कॅन्सरग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असल्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेन्द्र फडणवीस साहेब यांच्या लक्षात आलं.

मुंबईतील टाटा कॅन्सर रुग्णालयावर रुग्णांचा असलेला ओव्हरलोड लक्षात घेता टाटाच्या धर्तीवर नागपूरात भव्य कॅन्सर हॉस्पिटल उभारण्याचं स्वप्न श्री फडणवीस साहेब यांनी पाहिलं. डॉ जोगळेकर, श्री परिणय फुके, श्री सुमित वानखेडे, श्री राजूरकर, श्री पाठक अशा आपल्या विश्वासू टीमला सोबत घेऊन श्री फडणवीस साहेब यांनी हे स्वप्न सत्यात उतरवलं.

आज नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट नावाच्या मंदिरात हजारो रुग्णांवर महात्मा फुले योजना आणि धर्मादाय रुग्णालय योजना अंतर्गत मोफत आणि सवलतीच्या दरात उपचार घेत आहेत. हॉस्पिटलचा जनरल वॉर्ड मुंबईतील एखाद्या पंचतारांकित रुग्णालयाला लाजवेल असा आहे. येथील रेडिएशन थेरपी साठी उभारण्यात आलेली यंत्रणा जगातील अद्ययावत तंत्रज्ञान वर आधारीत आहे.

नियमित केमोथेरपी घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांचे वॉर्ड तर एवढे प्रशस्त, आल्हाददायक आणि स्वच्छ आहेत की रुग्णाला एखाद्या CCD कॉफीशॉप मध्ये आल्याचा भास व्हावा. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असणाऱ्या रुग्णासोबत एका नातेवाईकाची याठिकाणी राहण्याची आणि जेवणाची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे.

यासोबतच मला भावलेली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, इथे उभारण्यात आलेली धर्मशाळा. कारण रुग्णसेवक म्हणून मुंबईतील टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये जाण्याचा अनेक वेळा योग येतो, याठिकाणी कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांना अक्षरशः रस्त्यावर, फूटपाथवर झोपावे लागते. झोपण्याची, राहण्याची आणि जेवणाची अक्षरशः आबाळ होते. या गोष्टीचा अभ्यास करून या ठिकाणी अत्याधुनिक धर्मशाळेची केलेली उभारणी. या हॉस्पिटलच्या आवारात तब्बल 100 रुग्णांच्या नातेवाईकांना राहण्याची आणि जेवणाची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्याला रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा हाच रोकडा धर्म सांगणाऱ्या संत गाडगेबाबांच्या नंतर महाराष्ट्रात धर्मशाळा उभारणारा माणूस म्हणून श्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव इतिहासात कोरल जाईल हे नक्की. कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी मोफत व सवलतीच्या दरात उपचार करून रुग्णसेवा करणारे श्री फडणवीस एका अर्थानं आजच्या काळातील आधुनिक गाडगेबाबा आहेत असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही

जाता जाता – एक नम्र आवाहन. उद्या नागपूर अधिवेशन संपल्यानंतर परतीच्या प्रवासाला निघताना ज्यांना ज्यांना शक्य आहे अशा सर्वच मा.लोकप्रतिनिधी, मा.मंत्री , मा.आमदार,मा.पत्रकार बांधव सर्वांनीच या आरोग्य मंदिरास भेट द्यावी. हे आरोग्य मंदीर पाहुन, प्रेरणा घ्यावी आणि आपल्या आपल्या भागात अशी आरोग्य मंदिरे उभारण्यासाठी यथाशक्ती प्रयत्न करावेत, तरच संत गाडगेबाबा यांची रूग्णसेवा हीच ईश्वरसेवा ही उक्ती सार्थ ठरेल