मुंबई: राज्यातील लाखो महिलांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत जानेवारी महिन्याचा हप्ता लवकरच लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुकीपूर्वी डिसेंबर महिन्याचा हप्ता देण्यात आला होता. मात्र, जानेवारीचा हप्ता अद्याप वितरित करण्यात आलेला नव्हता.
महायुती सरकारने महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डिसेंबर आणि जानेवारी असे दोन महिन्यांचे पैसे एकत्र देण्याची घोषणा केली होती. परंतु राज्यात आचारसंहिता लागू झाल्याने राज्य निवडणूक आयोगाने ऍडव्हान्स स्वरूपात पैसे देण्यास बंदी घातली होती. त्यामुळे महिलांना फक्त डिसेंबर महिन्याचाच हप्ता मिळू शकला.
दरम्यान, आचारसंहिता संपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारादरम्यान जानेवारीचा हप्ता देण्याची ग्वाही दिली होती. आता फेब्रुवारी महिन्यात जिल्हा परिषद निवडणुका होत असून ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता मतदानापूर्वी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पात्र महिलांच्या खात्यात कोणत्याही क्षणी १५०० रुपयांचा हप्ता जमा होऊ शकतो. अद्याप सरकारकडून अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नसली, तरी पुढील १८ ते २० दिवसांत यासंदर्भातील शासन आदेश निघण्याची दाट शक्यता आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांचे लक्ष आता सरकारच्या अधिकृत घोषणेकडे लागले असून, जानेवारीचा हप्ता लवकरच मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.