प्रतिनिधीनींनी अचूक आणि निर्दोष सेवा कशी देता येईल यासंदर्भात व्यापक भूमिका घ्यावी…

महाराष्ट्र

मुंबई: मुंबई महानगरपालिकेतील घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत सॅनिटरी नॅपकिन मशीन बसविण्यासाठी काढलेल्या निविदेच्या घोटाळ्यासंदर्भात येत्या वीस मार्च रोजी बैठक बोलवावी. या बैठकीला विरोधी पक्षाच्या आमदारांना देखील बोलवण्यात यावे. अचूक आणि निर्दोष सेवा कशी देता येईल यासंदर्भात व्यापक भूमिका आपण घेतली पाहिजे, असे निर्देश उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधान परिषदेत दिले.

आज लक्षवेधी प्रश्नाअंतर्गत आमदार मा. ऍड. अनिल परब यांनी मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत सॅनिटरी नॅपकिन निविदेमध्ये घोटाळा झाला असल्याचे सांगितले. यामुळे नागरिकांमध्ये व विशेष करून महिला वर्गामध्ये असंतोष निर्माण झाला असल्याने शासनाने काय कार्यवाही केली या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. यासंदर्भात मा. मुख्यमंत्री यांच्या वतीने सन्माननीय मंत्रीमहोदय शंभूराज देसाई यांनी यावरती उत्तर दिले मात्र त्यांनी दिलेल्या उत्तरामुळे आमदार मा. ऍड. अनिल परब यांचे समाधान झाले नाही.

या विषयाचे गांभीर्य ओळखत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मंत्री महोदयांना निर्देश देताना म्हटले की, सदरचा प्रश्न हा अत्यंत महत्त्वाचा असून, महिलांना सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध झाले पाहिजेत. यासंदर्भात येत्या २० मार्च रोजी सन्माननीय मंत्रीमहोदयांच्या दालनात बैठक घेण्यात यावी. या बैठकीला विरोधी पक्षाच्या आमदारांना देखील बोलावले जावे.

तसेच सध्या जरी हा प्रश्न राखून ठेवला नसला तरी, २० मार्चच्या बैठकीत सदस्यांचे समाधान झाले नाही तर या लक्षवेधी प्रश्नाला ९७ अंतर्गत समाविष्ट केले जाईल आणि त्यावर सभागृहात चर्चा केली जाईल असे देखील उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नमूद केले.