पाबळ (सुनिल जिते) : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील पाबळ, कान्हूर मेसाई आणि केंदूर परिसरात यंदा पाणीटंचाईचे संकट लवकरच जाणवू लागले आहे. पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने विहिरींच्या पाणीपातळीत घट झाली असून, शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या गावांना तात्पुरता नव्हे, तर कायमस्वरूपी व ठोस पाणीपुरवठा यंत्रणा उभारण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
या भागातील अनेक गावांमध्ये पाण्यासाठी नागरिकांना दरवर्षी उन्हाळ्याची प्रतीक्षा करावी लागत असली, तरी यंदा पाण्याचा तुटवडा अपेक्षेपेक्षा लवकर जाणवू लागला आहे. कमी पावसामुळे विहिरी, बोअरवेल आणि अन्य जलस्रोतांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे आगामी काळात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
‘निवडणूक आली की पाण्याचा प्रश्न चर्चेत येतो; मात्र निवडणूक संपल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष होते,’ अशी नाराजी नागरिक व्यक्त करीत आहेत. वर्षानुवर्षे पाणीप्रश्न कायम असताना त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना का होत नाहीत, असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
पाबळ, कान्हूर मेसाई आणि केंदूर परिसरातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी उपलब्ध जलस्रोतांचा शाश्वत वापर, पाणी साठवणूक क्षमता वाढविणे, पाइपलाइन व्यवस्था सक्षम करणे तसेच आवश्यक ठिकाणी नवीन पाणीपुरवठा योजना राबविण्याची गरज आहे. प्रशासनाने पाणीटंचाई तीव्र होण्याची वाट न पाहता आतापासूनच नियोजन करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
पाणी हा केवळ निवडणुकीचा मुद्दा न राहता नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित मूलभूत प्रश्न आहे. त्यामुळे पाबळ, कान्हूर मेसाई आणि केंदूरला ठोस व कायमस्वरूपी पाणीपुरवठा करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.
Video; गेले दहा वर्ष तुम्ही आम्हाला फसवताय, पाबळच्या युवकाने आढळराव यांना पाणी प्रश्नावर घेरलं…
पाबळ कान्हूर मेसाईत टँकरची मागणी
शिरुरच्या बारा गावांच्या पाणीप्रश्नाबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणार; एकनाथ शिंदे