मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी कुटुंबांना दिलासा देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. दुष्काळग्रस्त भागातील ज्या शेतकरी कुटुंबांमध्ये मुला-मुलींची लग्न ठरली आहेत, त्यांच्या विवाहासाठी शिवसेनेच्या माध्यमातून शक्य ती मदत केली जाणार आहे. शिंदे यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे याबाबत माहिती दिली आहे.
दुष्काळ, नापिकी आणि कर्जाच्या संकटामुळे शेतकरी कुटुंबांसमोर मुला-मुलींच्या लग्नाचा खर्च उभा करण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर विवाहाच्या खर्चाची चिंता असलेल्या कुटुंबांना मदतीचा हात देण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे.
दुष्काळग्रस्त भागातील ज्या शेतकरी कुटुंबांमध्ये मुला-मुलींची लग्न ठरली आहेत, त्यांनी स्थानिक शिवसेना लोकप्रतिनिधी किंवा पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. संबंधित कुटुंबांना आवश्यक ती मदत शिवसेनेच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी जाहीर केले आहे.
‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही’
दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, असा शब्द एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दिला होता. त्यानंतर राज्य सरकारने ३५८ पैकी २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे.
दुष्काळ जाहीर करणे ही सुरुवात असून, संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत पोहोचवण्यावर भर राहणार असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता शेतकरी कुटुंबातील विवाहांसाठी शिवसेनेच्या माध्यमातून मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकरी कुटुंबांना मुला-मुलींच्या लग्नासाठी आर्थिक मदतीचा आधार मिळण्याची अपेक्षा आहे.