मुख्यमंत्र्यांनी दावोसमधल त्यांच वेळापत्रक समोर आणाव; आदित्य ठाकरेंच खुल आव्हान…

महाराष्ट्र

दावोसला जाऊन तुम्ही काय केलं त्यावर डिबेट करा; आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना ओपन चॅलेंज…

मुंबई: शिवसेना नेते युवा सेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱ्यासंदर्भात मोठा दावा केला. दावोसमध्ये महाराष्ट्र सरकारचा अधिकृत कार्यक्रम चार दिवसांचा होता. या कार्यक्रमावरील अंदाजे खर्च ४० कोटींएवढा झाल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केला. मुख्यमंत्र्यांच्या २८ तासांचा खर्च ४० कोटी एवढा झाल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केला. यावेळी आदित्य ठाकरे यांनी मविआ सरकारच्या दावोस दौऱ्याचं वेळापत्रक वाचून दाखवत दावोसला जाऊन तुम्ही काय केलं हे समोरासमोर बसून बोलूया, असं खुलं आव्हान आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं.

आदित्य ठाकरे म्हणाले, दावोसमध्ये राज्य सरकारचा चार दिवसांचा कार्यक्रम होता. याचा खर्च ४० कोटी एवढा झालाय. यापेक्षाही अधिक खर्च असू शकतो. कारण तिकडे त्यांचा सर्व मित्रपरिवारही गेला होता. चार दिवसांचा खर्च ४० कोटी होत असेल तर एका दिवसाचा खर्च साडे सात कोटी ते १० कोटींच्या घरात आहे. याचाच अर्थ त्यांनी १० कोटींचा खर्च प्रत्येक दिवसाला केला आहे, असा गंभीर आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.

आदित्य ठाकरेंनी दावोस दौऱ्यावर प्रश्न उपस्थित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. दावोसला जाताना घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी चार्टर्ड विमानाचा वापर केला. साधारणपणे २ ते २.५ कोटींचा खर्च झाला असेल. हा देखील खर्च राज्यावरच आला आहे. आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, माझा आक्षेप या चार्टर्ड विमानावर नाही. परंतु तुम्ही जेव्हा कमर्शियल विमान सोडून चार्टर्ड विमानाचा वापर करता तेव्हा त्याचा उपयोग वेळेवर पोहोचण्यासाठी करता की उशीरा पोहोचण्यासाठी करता, असा खरमरीत सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला.

आदित्य ठाकरे यांनी यावेळी मविआ सरकारच्या दावोस दौऱ्याच्या वेळापत्रकाची माहिती दिली. २२ मे २०२२ रोजी आम्ही आमच्या पेव्हेलियनचं उद्घाटन सकाळी ८.३० वाजता केलं होतं. हे घटनाबाह्य मुख्यमंत्री जेव्हा गेले तेव्हा त्यांनी उद्घाटन पहिल्याच दिवशी संध्याकाळी ६.३० ते ७ च्या सुमारास केलं. दावोसमध्ये पोहोचल्यानंतर त्यांच्या एक ते दोन बैठका झाल्या असतील. कारण आधीच्या बैठका त्यांच्या रद्द झाल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या बैठकांचं शेड्यूल आम्हाला कुठेही दिसलेलं नाही.

उद्योगमंत्री आणि MIDCनेही एकही ट्वीट केलेलं नाही. MIDCचे सीईओ गेले की नाही यावर देखील शंका आहे. हा प्रकार नक्की काय आहे. हा सर्व लोकांसमोर येणं गरजेचं आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्र्यांचा दावोसमध्ये फक्त एक ते दोन बैठका झाल्या. १६ तारखेला महाराष्ट्रासाठी महत्त्वाच्या बैठका मुख्यमंत्र्यांनी घेतल्या नाहीत.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी शाश्वत विकासावर भाषण दिलं. त्यांनी नेमकं काय भाषण दिलं हे मला ऐकायचं आहे, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला. आरेची झाडं कापल्यानंतर आणि जंगलातून बोगदे तयार केल्यानंतर मुंबईचा जोशीमठ करायला निघालेले मुख्यमंत्री हे शाश्वत विकासावर काय बोलले हे जाणून घेण्याची माझी उत्सुकता आहे. हे सर्व हास्यास्पद आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.