ऐतिहासिक भारत जोडो यात्रेने द्वेषाला दूर करून देशाला प्रेमाने जोडले; नसीम खान

महाराष्ट्र

मुंबई: केंद्रातील सत्ताधा-यांनी देशात द्वेष पसरवून सामाजिक ध्रुवीकरण घडवून आणले आहे व त्यावर ते आपल्या राजकीय पोळ्या भाजत आहेत. द्वेषाच्या या वातावरणामुळे देशाचे प्रचंड नुकसान झाले आहे. भाजपाने आपल्या राजकीय फयद्यासाठी द्वेषाच्या माध्यमातून लोकांना विभाजीत करण्याचे काम केले. त्याविरोधात ‘नफरत छोडो, भारत जोडो’ असा नारा देत राहुलजी गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून देशाला पुन्हा एकदा प्रेमाने जोडले आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान म्हणाले.

महागाई, बेरोजगारी तसेच जीएसटीमुळे देशात निर्माण झालेली आर्थिक विषमता, सामाजिक ध्रुवीकरण, केंद्रीय संस्थांचा गैरवापर या मुद्द्यांवर राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारीहून निघालेली भारत जोडो यात्र ४ हजार किलोमीटरचा प्रवास करून काश्मीरच्या श्रीनगरमध्ये पोहोचली आहे. आज श्रीनगर येथे ध्वजारोहण करून या यात्रेचा समारोप झाला. या यात्रेच्या समर्थनार्थ प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे नसीम खान यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी संपूर्ण विश्वाला सत्य, अहिंसा, शांतीच्या मार्ग दाखवला. त्यांनी दाखवलेल्या या मार्गावर चालूनच भारताने प्रगती केली आहे. हाच विकासाचा शाश्वत मार्ग असून गांधीजींच्या भारतात द्वेषाला जागा नाही. केंद्रातील नरेंद्र मोदी यांचे सरकार व भारतीय जनता पक्षाने आपल्या राजकीय फायद्यासाठी या देशात जाती धर्माच्या आधारावर ध्रुवीकरण करून देशाला विभाजीत करण्याचे काम केले आहे. राहुलजींच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेने केंद्रातील सत्ताधा-यांनी देशात पसरवलेल्या द्वेषाला प्रेमाने उत्तर दिले आहे. या ऐतिहासीक यात्रेने संपूर्ण देशाला प्रेमाच्या धाग्याने जोडले आहे.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस प्रमोद मोरे, मुनाफ हकीम, प्रवक्ते निझामुद्दीन राईन, भरत सिंह, नासीर हुसेन, राणी अग्रवाल, प्रदेश सचिव राजाराम देशमुख, विनय राणे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.