वाशिम: वाशिम जिल्ह्यातील ब्रह्मी (ता. वाशिम) येथे देशी व विदेशी दारूविक्रीच्या मंजूर अनुज्ञप्ती रद्द करण्यासाठी सोमवारी (दि. ९) केवळ महिलांसाठी विशेष मतदान घेण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ही प्रक्रिया पार पडली.
या मतदानात गावातील तरुणी, विवाहित तसेच ज्येष्ठ महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला आणि दारूविक्री बंद करण्याच्या बाजूने ठाम कौल दिला. निकाल जाहीर होताच महिलांनी जल्लोष करत आनंदोत्सव साजरा केला.
गावातील मुख्य रस्त्यावर आणि बसस्थानकाजवळ दारूचे दुकान असल्याने महिलांना, विशेषतः शाळकरी मुलींना ये-जा करताना अस्वस्थता जाणवत होती. दारूच्या नशेत असलेल्या काही व्यक्तींमुळे त्रास होण्याची शक्यता असल्याची तक्रार ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली होती. यानंतर गावातील महिलांनी पुढाकार घेत परवाना रद्द करण्याची मागणी केली. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी महिलांचा कौल जाणून घेण्यासाठी विशेष मतदान घेण्याचा निर्णय घेतला.
सोमवारी सकाळपासून शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. सायंकाळी ५.३० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. एकूण ८१४ महिला मतदारांपैकी ५५३ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यापैकी तब्बल ५२३ महिलांनी दारूचे दुकान हटविण्याच्या बाजूने मत दिले, तर १४ महिलांनी दुकान कायम ठेवण्याच्या बाजूने मतदान केले. १६ मते अवैध ठरली.
या प्रक्रियेसाठी तहसीलदार नीलेश पळसकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मार्गदर्शन केले. नायब तहसीलदार व इतर कर्मचाऱ्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने प्रक्रिया पूर्ण केली. निकालानंतर दारूविक्री परवाना रद्द करण्यासंदर्भात दारूबंदी विभागाला आवश्यक सूचना देण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली.
महिलांनी दिलेला स्पष्ट आणि एकमुखी कौल लक्षात घेता प्रशासनाकडून लवकरच अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या निर्णयामुळे गावात सुरक्षित आणि सकारात्मक वातावरण निर्माण होईल, अशी अपेक्षा महिलांनी व्यक्त केली आहे.