मुंबई: NEET पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित पोलिस कारवाईच्या निषेधार्थ मुंबई युवक काँग्रेसने वांद्रे आणि बोरीवली (पश्चिम) येथे बॅनर फडकावून निदर्शने केली. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पेलेट गनचा वापर आणि गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप करत युवक काँग्रेसने केंद्र सरकारवर टीका केली.
युवक काँग्रेसने पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिस बळाचा वापर झाल्याचा निषेध व्यक्त केला. तसेच या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राजीनामा द्यावा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली.
मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात मुंबई उत्तर मध्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष निखिल रुपारेल, उत्तर मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष अजयकुमार मिश्रा यांच्यासह तेजस चंदूरकर, अमनदीप सिंह, मितेश सोनकर, मुस्तकीम शेख, विकास जैसवार, आशीष सरोज, विजय नगराळे, आरिफ सय्यद आणि दीपक विश्वकर्मा आदी पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेत केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली.