करंदीत एकच रात्रीत दोन ठिकाणी चोऱ्या

क्राईम शिरूर तालुका

सोन्याच्या दागिन्यांसह ६ लाख ९२ हजारांचा ऐवज चोरी

शिक्रापूर: करंदी (ता. शिरुर) येथील भारत गॅस फाटा परिसरात (दि. २७) जून रोजी एका घरासह एका हॉटेल मध्ये अज्ञात चोरट्यांनी चोरी करुन सोन्याच्या दागिन्यांसह तब्बल ६ लाख ९२ हजार रुपयांचा ऐवज चोरी केला असून याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात ५ आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

करंदी (ता. शिरुर) येथील भारत गॅस फाटा येथील बाळासाहेब ढोकले यांचे कुटुंबीय घरात झोपेलेले असताना बाळासाहेब यांची आई शांताबाई व मुलगा निखील हे एका खोलीत झोपले होते. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास अचानकपणे ढोकले यांची आई शांताबाई ओरडल्याचा आवाज आला म्हणून घरातील सर्वजण जागे झाले. त्यावेळी त्यांनी काय झाले विचारले असता निखील याने घरातून ५ लोके खिडकीतून पळून गेले असल्याचे सांगितले.

त्यामुळे ढोकले यांनी घरात तपासणी केली असता कपाट तसेच लोखंडी पेट्या खोलून चोरट्यांनी चक्क पंचारा तोळे वजनाचे ६ लाख ८७ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरुन नेल्याचे समोर आले. त्यावेळी ढोकले यांनी घराच्या बाहेर येऊन पाहणी केली असता चोरट्यांनी खिडकीचे गज उचकटून घरात प्रवेश करून चोरी केल्याचे दिसून आले, तर याच दिवशी सकाळच्या सुमारास येथील एम एच २३ हॉटेलचे मालक पवन खांडे हे सकाळच्या सुमारास हॉटेल उघडण्यास आले असता त्यांना हॉटेलच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले त्यामुळे त्यांनी आतमध्ये जाऊन पाहणी केली असता हॉटेल मधील देवीचे चांदीचे नाणे तसेच रोख रक्कम असा पाच हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याचे समोर आले.

याबाबत बाळासाहेब शामराव ढोकले (वय ४०) रा. करंदी भारत गॅस फाटा (ता. शिरुर) जि. पुणे व पवन गणपतराव खांडे (वय ३२) रा. फडतरे वस्ती कोरेगाव भीमा (ता. शिरुर) जि. पुणे मूळ रा. पिंपळगाव माजरा ता. बीड जि. बीड यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात आरोपींवर गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंके व पोलीस नाईक भरत कोळी हे करत आहे.