शिरुर तालुक्यात तीन दिवसांपासुन विहिरीत पडलेल्या कुत्र्याला जीवदान

शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे गावातील शेणाचा मळा येथील एका विहिरीत तीन दिवसांपुर्वी पडलेल्या कुत्र्याला सर्पमित्र गणेश टिळेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्व सुरक्षित उपकरणांच्या साह्याने विहिरीमध्ये उतरत कुत्र्याला सुरक्षितपणे बाहेर काढून जीवदान दिले आहे.

येथील शेतकरी मंगेश नरके हे विहिरीवर असलेला विद्युत पंप चालू करण्यासाठी गेले असता त्यांना विहिरीतून एका प्राण्याचा ओरडण्याचा आवाज आला त्यांनी डोकून पाहिले असता एक कुत्रा त्यांना कपारीच्या कडेला बसलेला दिसला. मंगेश यांनी बरेच प्रयत्न करुनही त्यांना त्या कुत्र्याला बाहेर काढता न आल्याने शेतकरी मंगेश नरके यांनी तळेगाव ढमढेरे येथील सर्पमित्र गणेश टिळेकर यांच्याशी संपर्क साधून विहिरीमध्ये कुत्रा पडला असल्याची माहिती दिली.

त्यानंतर तात्काळ माहिती मिळताच नेचर गार्ड ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष सर्पमित्र गणेश टिळेकर, सदस्य वैभव निकाळजे, राजेंद्र डफळ, राहुल गायकवाड, भावेश गायकवाड, राज जावळे, विशाल काळे हे सर्वजण टीमसह तेथे हजर झाले. त्यानंतर सर्व सुरक्षित उपकरणांच्या साह्याने त्यांनी विहिरीमध्ये उतरत कुत्र्याला सुरक्षितपणे बाहेर काढत सोडून दिले.