सरदवाडी ग्रामस्थांच्या मदतीमुळे जखमी वृद्ध व्यक्तीस मिळाले वेळेवर उपचार

शिरूर तालुका

कारेगाव (बाळासाहेब जाधव) सरदवाडी येथे (दि 7) रोजी नगर-पुणे रोड येथे माणिकचंद कंपनी शेजारी पायी प्रवास करीत असताना अज्ञात वाहनाच्या धडकेने एक वृद्ध व्यक्ती जखमी अवस्थेत पडलेली असताना एका जागरूक नागरिकाने पाहिले. त्यानंतर त्याने काही ग्रामस्थांना याबाबत माहिती दिली. ग्रामस्थांनी तातडीने 108 ला फोन करुन रुग्णवाहिका बोलावून संबंधित व्यक्तीस पुढील उपचारासाठी दवाखान्यात पाठवून दिले. ग्रामस्थांनी केलेल्या तातडीच्या मदतीमुळे या वृद्ध व्यक्तीला वेळेवर उपचार मिळाले आहेत.

याबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे सरदवाडी गावातील जागरुक नागरिक हर्षद बुद्धिवंत यांना नगर-पुणे रस्त्यावर एक अनोळखी व्यक्ती जखमी अवस्थेत पडलेला दिसला. त्यानंतर त्यांनी सरदवाडी ग्रामपंचायत कर्मचारी भगवान जाधव यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर जाधव यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे संपर्क साधत 108 नंबरला फोन करुन रुग्णवाहिका बोलावून घेतली.

यावेळी घटनास्थळी सरदवाडीचे सामाजिक कार्यकर्ते विजय कुंडलिक, अखिल भारतीय मराठा महासंघाचे युवक तालुकाध्यक्ष गणेश सरोदे ,युवा उद्योजक प्रमोद कुंडलिक, सामाजिक कार्यकर्ते बुगा सरोदे आणि इतरांच्या सरदवाडी मदतीने या जखमी रुग्णाला रुग्णवाहिकेतून दवाखान्यात पुढील उपचारासाठी रवाना केले. या सर्वांनी सामाजिक बांधिलकी जपत अनोळखी व्यक्तीला उपचारासाठी तातडीने मदत केल्याने सरदवाडी ग्रामस्थांकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.