पुणे नगर महामार्गावरील अपघातांना येणार नियंत्रण…

शिरूर तालुका

भाजपा कामगार आघाडीच्या पुढाकाराने महामार्गावर ब्लिंकर

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये असलेल्या पुणे नगर महामार्गावर अपघातांचे प्रमाण वारंवार वाढत असताना सदर अपघात रोखण्यासाठी भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीने पुढाकार घेऊन महामार्गावर ब्लिंकर बसवल्याने पुणे नगर महामार्गावरील अपघातांवर आता नियंत्रण येणार आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पुणे नगर महामार्गावर वारंवार अपघात होऊन अनेकांना जीव गमवावा लागत असताना सदर महामार्गावर अपघात घडणाऱ्या ठिकाणी असलेल्या दुभाजकांवरील वळणाच्या ठिकाणी कोठेही दिशादर्शक अथवा वाहन चालकांना इशारा देणारे ब्लिंकर नसल्याचे भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष जयेश शिंदे यांच्या निदर्शनास आले.

सदर महामार्गावरील शिक्रापूर ते वाघोली रस्त्याने काम यापूर्वीच पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व माजी आमदार स्व. बाबुराव पाचर्णे यांच्या माध्यमातून सुरु झालेले असल्याचे लक्षात आल्याने जयेश शिंदे यांनी पालकमंत्री, सार्वजनिक बांधकाम विभाग व रस्त्याचे ठेकेदार यांच्याशी वारंवार चर्चा करुन पुणे नगर महामार्गावर अपघात प्रणय क्षेत्राच्या ठिकाणी ब्लिंकर बसवून घेतले आहे. या ब्लिंकर मुळे वाहन चालकांना रस्त्याचा अंदाज, धोक्याचा सिग्नल मिळणार असल्याचे आता रस्त्यावर होणाऱ्या अपघातांवर आळा बसणार आहे.