शिरुर तालुक्यातील पारोडी येथे अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता

शिरूर तालुका

शिक्रापुर (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील पारोडी गावात नुकताच ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित (वर्ष २०वे) अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात संपन्न झाला. या भव्य अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता भजनी मंडळ व ग्रामस्थांनी गावातून दिंडी काढून करण्यात आली. टाळ मृदंगाच्या तालावर हरी नामाच्या जयघोषात अवघे ग्रामस्थ तल्लीन झाले होते. कोणी फुगडी खेळत, तर कोणी हरिनामाच्या गजरात तल्लीन होऊन टाळ मृदुंगाच्या तालावर ठेका धरत नाचत होते.

या दिंडीने गाव प्रदक्षिणा सुरुवात होताच महिलांनी रस्त्यावर प्रत्येक दारासमोर सडा, रांगोळी काढत ठिकठिकाणी या दिंडीचे स्वागत केले. या दिंडीत महिला, ज्ञानेश्वरी पारायण, तुळशी वृंदावन, बाळ गोपाळ यांच्यासह भाविक, वारकरी ग्रामस्थ सामील होते. गाव प्रदक्षिणा पूर्ण होताच, चौकात मुख्य ठिकाणी आल्यानंतर या चौकात दरवर्षी प्रमाणे मोठे रिंगण करण्यात आले.

 

या रिंगणात युवा भारुडकार निलेश महाराज गायकवाड यांनी महिलेचे रुप धारण करून महिलेची वेशभूषा परिधान करून ‘ दे गं माय दे’ हे मनोरंजक हास्यमय भारुड सादर केले. त्यानंतर ‘लग्न सोहळा’ हे भारुड झाले. व टाळ मृदंगाच्या तालावर हा दिंडी सोहळा उत्साहात संपन्न झाला. यानंतर ह.भ.प नवनाथ महाराज माशेरे यांचे सुश्राव्य असे काल्याचे किर्तन झाले व दही हंडी कार्यक्रम पार पडला. पारोडी ग्रामस्थांनी महाप्रसाद महापंगत दिली. सप्ताहाचे खूप चांगले नियोजन ग्रामस्थांनी केले होते. विशेषतः तरुण पिढीने उत्साहाने सहभाग घेतला होता.

 

या संपूर्ण सप्ताह साठी किर्तनसेवा हभप अक्षय महाराज डोंगरे, प्रवीण महाराज होळकर, सृष्टीताई महाराज पिंगळे, दत्तात्रय महाराज माशेरे, खंडेश्वर महाराज टोनगे, सुरेश महाराज साठे यांनी दिली. तब्बल सात दिवस ज्ञानेश्वरी ,पारायण व आठ दिवस, दिवस रात्र विणा पूजा अर्चा सेवा अखंडित चालू होती. या अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता सोहळ्याप्रसंगी पारोडी,म्हाळुंगी, सातकरवाडी, येळे वस्ती,पिराची वस्ती सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिरुर पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षकपदी संदेश केंजळे यांची नियुक्ती; ज्योतिराम गुंजवटे यांची मुख्यालयात बदली

शिरुर पोलीस स्टेशनला सिंघम अधिकाऱ्यांची गरज…? गेल्या वर्षेभरात गुन्हेगारीचा आलेख उंचावला

शिरुर मधुन घरासमोर पार्क केलेली हुंडाई क्रेटा गाडी चोरट्याने नेली चोरुन, महीनाभरातील तिसरी घटना