शिरुर तालुक्याच्या पुर्व भागात अवैध दारुविक्री जोमात 

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील मोटेवाडी, निमोणे, गुणाट, चिंचणी, करडे, चव्हाणवाडी, आंबळे, शिंदोडी या भागात मोठया प्रमाणात अवैध व्यवसाय सुरु असुन निमोणे गावात मोठया प्रमाणात गावठी दारु तसेच हॉटेल व ढाब्यांवर बेकायदेशीर दारुविक्री केली जात आहे. त्यामुळे या तळीरांमाचा सर्वसामान्य लोकांना त्रास होत असुन बेट भागात शिरुर पोलिसांनी जशी बेकायदेशीर दारुवर कारवाई केली तशीच कारवाई निमोणे गावात का केली जात नाही असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

शिरुर- निर्वी रस्त्यावरील निमोणे हे मोठे गाव असुन या गावची लोकसंख्या जवळपास 5 हजारच्या आसपास असुन या ठिकाणी अंदाजे 15 ते 20 विटभट्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी बाहेरुन अनेक मजुर कामाच्या निमित्ताने आलेले आहेत. तसेच निमोणे येथे प्राथमिक आरोग्य केंद्र, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक, स्टेट बँक आणि दर बुधवारी आठवडे बाजार असल्यामुळे मोठया प्रमाणात बाहेरच्या गावातून कामानिमित्त येणाऱ्या लोकांची वर्दळ असते.

त्यामुळे निमोणे गावात मोठया प्रमाणात अवैध धंद्याना ऊत आला असुन गावाच्या चारही दिशेला गावठी दारुचे अड्डे आहेत. तसेच गावाच्या आसपास असलेल्या हॉटेलवर मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररित्या दारूविक्री केली जाते. त्यामुळे धंदे करणाऱ्या पोलिसांचा धाक आहे की नाही असा प्रश्न सर्वसामान्य लोक विचारत आहेत. सध्या अधिक श्रावणमास चालू असल्याने या अवैध दारू धंदा विक्री करणाऱ्या लोकांवर पोलिस कारवाई करण्यासाठी मुहूर्त शोधत आहेत का…? असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडला आहे.