नवरात्रीत गरजू महिलांना साड्या द्यायला अवतरल्या सीमाईच्या दुर्गा

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): सर्वत्र नवरात्र उत्सव महिला आनंदात साजरा करत प्रत्येक दिवसाचा रंग पाळत असतात. मात्र भटकंती करत उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांचे काय या विचाराने त्यांना देखील नवरात्रचा आनंद देण्याच्या प्रयत्नातून सीमाई आधार फाउंडेशनच्या महिलांनी गरजू महिलांना साड्या वाटप करत सामाजिक भान राखले आहे.

सणसवाडी (ता. शिरुर) येथील सीमा पवार यांनी स्थापन केलेल्या सीमाई आधार फाउंडेशनच्या माध्यमातून नेहमीच सामाजिक उपक्रमे राबविले जात असताना सध्या नवरात्र मध्ये महिला प्रत्येक दिवसाचा रंग पाळून त्या दिवसाच्या रंगाची साडी घालत असतात.

मात्र भटकंती करुन कुटुंब चालवणाऱ्या महिलांचे काय असा प्रश्न पडल्याने सीमाई आधार फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा सीमा पवार, सामाजिक कार्यकर्त्या छाया सकट, सुभद्रा दरेकर यांनी अशा प्रकारे राहणाऱ्या महिलांच्या पालावर अचानक भेटी देत महिलांना साड्या वाटप केल्या.

दरम्यान गरीब महिलांना अचानक नव्या साड्या भेटल्याने महिलांनी आंनद साजरा केला तर त्यांच्या मुलांना सुद्धा नवीन शर्ट वाटप केल्याने मुलेही आनंदाने बागडू लागली, यावेळी काही महिलांनी आमच्या घरी दुर्गामाताच आल्या, अशा भावना व्यक्त केल्या, तर यावेळी बोलताना गरीब महिलांच्या चेहऱ्यावर आनंद पाहून मनाला मोठे समाधान मिळाले असल्याचे सीमाई आधार फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा सीमा पवार यांनी सांगितले.