शिरुर तालुक्यात वाळूच्या पैशाच्या वादातुन दोन ठेकेदारांमध्ये तुंबळ हाणामारी

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील चिंचणी येथील वाळू डेपोत पैशाच्या तसेच वाळू जास्त दराने विकत असल्याच्या वादातुन वाळू वाहतुक करणाऱ्या दोन ठेकेदारांमध्ये शुक्रवारी रात्री तुंबळ हाणामारी झाली असुन त्यातील एका ठेकेदाराने दुसऱ्या ठेकेदाराला बेदम मारहाण केली आहे. त्यामुळे शिरुर तालुक्यात वाळूच्या ठेक्यावरुन जीवघेणी स्पर्धा सुरु होण्याची चिन्ह असुन भविष्यात शिरुर तालुक्यात कायदा आणि सुव्यस्था बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शिरुर तालुक्यातील निमोणे आणि चिंचणी येथे शासकीय वाळू डेपोला परवानगी मिळाली. त्यानंतर वाळू उपसा करणाऱ्या ठेकेदारांनी बेकायदेशीररीत्या घोड धरणातून वाळू उपसा करण्याचा सपाटाच लावला असुन त्यामुळे वाळू उपसा करणाऱ्या निविदेमध्ये दिलेल्या अटी आणि शर्तीचा भंग होत आहे. परंतु वाळू ठेकेदारांकडे महसूल विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

 

चिंचणी येथील वाळू डेपोत सध्या रोज हजारो ब्रास वाळूचा साठा केला जातो. मात्र तो वाळूसाठा रोजच्या रोज ऑनलाईन अपडेट केला जात नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना शासनाने 600 रुपये ब्रास वाळू मिळणार कशी हा मोठा यक्षप्रश्न आहे. तसेच हे वाळू ठेकेदार एका ब्रासला सुमारे 4000 ते 5000 रुपये ब्रास प्रमाणे वाळू विकत असुन वाळूविक्रीच्या जास्त दरावरुनच दोन ठेकेदारांची तुंबळ हाणामारी झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

 

घोड धरणातील काळ्या धनासाठी जीवघेणा संघर्ष…?

शिरुर तालुक्यात निमोणे, कुऱ्हाडवाडी, शिंदोडी, चिंचणी या परिसरातील सध्या वाळू डेपोच्या नावाखाली मोठया प्रमाणात निविदेमधील नियम व अटींचा भंग करत बेकायदेशीर वाळू उपसा सुरु असुन वाळूच्या ठेकेदारांमध्ये घोड धरणातील काळ्या धनासाठी जीवघेणा संघर्ष सुरु झाला असुन पैशाच्या हव्यासापोटीच त्या दोन वाळू ठेकेदारांची तुंबळ हाणामारी झाली असल्याची सगळीकडे दबक्या आवाजात चर्चा असुन सर्वसामान्य लोकांना कमी दरात वाळू मिळणे तर सोडाच पण भविष्यात वाळू ठेकेदारांच्याच वादामुळे आता कायदा आणि सुव्यस्था बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.