शिरुरमध्ये जबरी चोऱ्या, अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल

क्राईम शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे): सविंदणे (दि. १8) शिरूर शहरातील ओयासीस सोसायटी मध्ये बंद सदनिकेसह शेजारील 2 घरांचे कुलूप तोडून सदनिकेतील सोन्या चांदीच्या दागिन्यांसह 1 लाख ८० हजाराचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरुर शहरातील ओयासीस सोसायटी मध्ये राहणारे सतीश तागड हे १४ ऑगस्ट रोजी त्यांच्या सदनिकेला कुलूप लावून बाहेर गेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळच्या सुमारास सतीश तागड यांच्या सह त्यांच्या शेजारील बाळासाहेब थोरात व सुहास जाधव यांच्या घरांच्या दरवाजाचे कडी कोयंडे चोरट्यांनी तोडल्याचे दिसून आले. यावेळी पाहणी केली असता थोरात व जाधव यांच्या घरातील काही चोरीला गेले नसल्याचे दिसले. मात्र तागड यांनी घरात जाऊन पाहणी केली असता घरातील सोन्या, चांदीचे दागिने तसेच काही रोख रक्कम असा तब्बल 1 लाख 80 हजारांचा ऐवज चोरीला गेल्याचे दिसून आले.

याबाबत सतीश जगन्नाथ तागड (वय ५५) रा. ओयासीस सोसायटी शिरुर ता. शिरुर जि. पुणे यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने शिरुर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप यादव हे करत आहे.