अनेक वर्ष रखडलेल्या सविंदणे येथे पुलाच्या कामासाठी निधी मंजूर

शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे): सविंदणे (ता. शिरुर) येथील लंघेवस्ती, मडके आळी येथे नागरीकांना दळणवळणासाठी गेले कित्येक वर्षापासून पुल उपलब्ध नव्हता. त्यामुळे पावसाळ्यामध्ये तेथील ओढयाला पाणी असल्यामुळे विदयार्थ्यांना गावातील शाळेत जाण्यासाठी, शेतीमालाची वाहतुक करण्यासाठी, दुध वाहतुक करण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली होती. मोठा वळसा घालून नागरीकांना ये -जा करावी लागत होती.

या ओढयावर असणारा छोटा पुल वाहून गेल्याने पुलापलीकडील लंघे वस्ती, मडके आळी यांचा गावापासून काही दिवस संपर्क तुटला होता. घटनास्थळी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, भिमाशंकर सह. कारखान्याचे चेअरमन प्रदीप दादा वळसे पाटील यांनी भेट दिली होती. त्यांनी संबंधित आधिकाऱ्यांना सुचना देत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर. वाय. पाटील, नवनाथ शेळके यांना तात्काळ इस्टीमेट करण्याच्या सुचना देत प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या.

सविंदणे गावच्या सरपंच सोनाली खैरे, उपसरपंच अभिजित लंघे, शुभांगी पडवळ, माजी सरपंच वसंत पडवळ, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष बाळासाहेब भोर यांनी पाठपुरावा करत दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून तब्बल १ कोटी ३८ लक्ष रुपयांचा निधी मंजूर मंजूर केला आहे. त्यामुळे परिसरातील नागरीकांनी पेढे वाटून समाधान व्यक्त केले आहे.