Ghodganga sugar Factory

घोडगंगा कारखान्यावर कारवाईची टांगती तलवार…

शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके): घोडगंगा सहकारी साखर कारखान्याने अद्यापही शेतकऱ्यांची एफआरपीची रक्कम न दिल्यामुळे कारखान्यावर कारवाई होऊ शकते, तसा कारवाईसाठीचा प्रस्ताव देखील प्रादेशिक सहसंचालक पुणे धनंजय डोईफोडे यांनी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना पाठविला आहे, अशी माहिती प्रादेशिक सहसंचालक (साखर) पुणे धनंजय डोईफोडे यांनी दिली.

घोडगंगा कारखान्याची निवडणूक तात्पुरती स्थगित झाली आहे. त्यात कारखान्याचे चेअरमन, आमदार अशोक पवार यांच्या विरोधात विरोधी गटाने दंड थोपटले आहे. दरम्यान, शेतकऱ्यांची एफआरपी थकीत असल्याने विरोधकांनी याबाबत आवाज उठवला आहे. शेतकरी सभासदांचे हक्काचे पैसे मिळत नसल्याने सातत्याने सत्ताधाऱ्यांवर विरोधी गट हल्लाबोल करत आहेत. तरी देखील अजुनपर्यंत एफआरपी देण्यात आली नाही. मात्र कारखान्यावर आता एफआरपी न दिल्याने कारवाईची टांगती तलवार आली आहे.

प्रादेशिक सहसंचालक (साखर) पुणे विभाग यांच्याकडून घोडगंगा सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्यांची एफआरपी अदा न केल्याने कारखान्याबाबत महसुली वसुली प्रमाणपत्र (RCC) निर्गमित करण्याबाबतचा शिफारस प्रस्ताव साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. इतिहासात प्रथमच अशा प्रकारच्या कारवाईला सामोरे जाण्याची वेळ कारखान्यावर येऊन ठेपली असून सभासदांकडुन याबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.

काय होऊ शकते कारवाई ?
कारखान्याने ‘एफआरपी’ न दिल्याने थकीत रक्‍कमेवर १५ टक्के व्याज; तसेच कारखान्याने उत्पादित केलेली साखर, मोलॅसिस आणि बगॅस यांची विक्री करून त्यामधून ‘एफआरपी’ची रक्कम वसूल करण्यात येते. आवश्यकता भासल्यास कारखान्याच्या जंगम आणि स्थावर मालमत्तेचा लिलावही केला जाऊ शकतो. या कारवाईसाठी जिल्हाधिकारी, तहसीलदार यांची नेमणूक केली जाते.

कारखान्याने आत्तापर्यंत एफआरपीची रक्कम पूर्ण केली नाही. तब्बल २५ कोटी ६८ लाख रुपये थकीत आहे. ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणे बंधनकारक असतानाही कारखान्यातील सत्ताधाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने कारखान्यावर कारवाईची वेळ आली आहे.
– माजी व्हाईस चेअरमन दादा पाटील फराटे

आपल्या घोडगंगाचे चेअरमन व आमदार अशोक पवार यांच्या भ्रष्ट व मनमानी कारभारामुळे कारखान्याची बदनामी होत असुन आता पार कारखान्यावर एफआरपी न दिल्यामुळे जप्तीची वेळ येणे ही खुपच दुःखदायक गोष्ट आहे .आमदारांनी राजकारण करण्यापेक्षा सभासदांच्या कारखान्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
– सुधीर फराटे (संचालक घोडगंगा सहकारी साखर कारखाना)