मुलींनी स्पर्धा परीक्षेच्या हेतूने अभ्यास करावा; माधुरी झेंडगे

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): विद्यार्थिनींनी शालेय जीवनात मोबाईल व टीव्हीच्या आहारी न जाता स्पर्धा परीक्षेचे ध्येय समोर ठेवून अभ्यास करावा तसेच मुलींच्या मातांनी देखील मुलींसमोर मोबाईल व टीव्हीचा जास्त वापर टाळावा असे प्रतिपादन पोलीस उपनिरीक्षक माधुरी झेंडगे यांनी केले आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील विद्याधाम प्रशाला येथे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा व विद्यार्थिनी व त्यांच्या मातांना मार्गदर्शन करताना पोलीस उपनिरीक्षक माधुरी झेंडगे बोलत होत्या. यावेळी प्राचार्य सोनबापू गद्रे, उपप्राचार्य सुनील थोरात, पर्यवेक्षक संजय शेळके, उपसरपंच विशाल खरपुडे, माजी उपसरपंच सुभाष खैरे, शालेय समितीचे अध्यक्ष सुनील मांढरे, राष्ट्रपती पुरस्कार विजेते मुख्याध्यापक श्रीधर टेमगिरे, अंकुश घारे, पोलीस नाईक ज्योती आहेरकर यांसह आदी उपस्थित होते.

यावेळी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून मंत्रालय कक्षाधिकारी पदी निवड झालेल्या पूजा जगताप, विक्रीकर निरीक्षक पदी निवड झालेल्या अरुंधती दिघे, मोनिका ढमढेरे, सौरभ ढोकले यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

दरम्यान यावेळी बोलताना युवतींनी आपल्या आवडत्या क्षेत्रात लक्ष केंद्रित करत अभ्यास करावा, आपले आई वडील आपल्याला शिक्षक देण्यासाठी करत असलेल्या कष्टाची जाणीव ठेवत आपले ध्येय गाठावे तसेच युवतींच्या मातांनी देखील युवतींशी सुसंवाद ठेवावा, असे आवाहन देखील पोलीस उपनिरीक्षक माधुरी झेंडगे यांनी केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रोहिणी नरके यांनी केले तर प्रास्ताविक प्राचार्य सोनबापू गद्रे यांनी केले आणि पर्यवेक्षक संजय शेळके यांनी आभार मानले.