शिरूरच्या पश्चिम भागात गारांचा पाऊस…

महाराष्ट्र शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यात दोन दिवसांपासून पावसाचे वातावरण असून पश्चिम भागात आमदाबाद, मलठण, कवठे येमाई, टाकळी हाजी, निमगाव दुडे, फाकटे, म्हसे, माळवाडी या गावांमध्ये शुक्रवारी थोड्याफार प्रमाणात तर शनिवारी गारांसह पाऊस पडला आहे. या पावसामुळे काढणीला आलेल्या कांद्याचे नुकसान झाले असून या वातावरणाचा इतर पिकांनाही मोठा फटका बसला आहे. बियाणे तयार करण्यासाठी लावलेले कांदा पीक फुलोऱ्यात आले असून या पिकाचेही नुकसान झाले आहे.

अगोदरच कांद्यास बाजार नाही आणि या पावसामुळे कांदा पिकाबरोबरच बियाणे पीक सुध्धा धोक्यात आल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. या भागात डाळिंबाच्या बागा मोठ्या प्रमाणात असून क्रॉप कव्हर कागद टाकलेला असल्यामुळे काही प्रमाणात फळांचा बचाव झाला आहे. क्रॉप कव्हर कागदामुळे उन्हापासून तर बचाव होतोच शिवाय गारांपासूनही संरक्षण होत असल्याने डाळिंब शेतकऱ्यांनी क्रॉप कव्हर कागद टाकण्याचे आवाहन डाळिंब मार्गदर्शक कैलास गावडे यांनी केले.