पोलिसांना एक महिना दिवाळी बोनस व जुनी पेन्शन योजना लागू करा

शिरूर तालुका

पोलिसाच्या पत्नीची मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांसह पोलीस अधीक्षकांकडे मागणी

शिक्रापूर (शेरखान शेख): पोलीस विभाग वगळता सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना आठवड्यात दोन दिवस सुट्टी असून इतर शासकीय सुट्ट्या देखील असतात. मात्र पोलिसांना चोवीस तास कर्तव्य बजावावे लागते. तसेच 12 ते 15 तास नोकरी करावी लागते, तरीही त्यांच्या पगारात वाढ नाही त्यामुळे पोलिसांना एक महिन्याचा पगार बोनस देत जुनी पेंशन योजना लागू करावी, अशी मागणी पोलीस पत्नी गिता तेजस रासकर यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्यासह पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे.

पुणे ग्रामीण पोलीस दलातील पोलीस नाईक तेजस रासकर यांच्या पत्नी गिता रासकर यांनी सदर मागणी केलेली असून पोलिसांच्या प्रश्नांवर आवाज उठविण्यासाठी संघटना नसल्याने अनेक दिवस मागण्या करुन देखील पोलिसांच्या मागण्या मान्य होत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

कोरोना काळामध्ये कर्तव्य बजावत असताना अनेक पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू देखील झाला आहे, तर नोव्हेंबर २००५ च्या नंतर पोलीस कर्मचाऱ्यांना अंशदान निवृत्ती वेतन लागु केलेली आहे. ही योजना शेअर बाजार वर आधारित असून त्यावर टॅक्सची तरतूद आहे.

तसेच जुन्या पेन्शन योजनेमुळे सेवानिवृत्त झाल्यानंतर कर्मचारी यांना जो लाभ मिळायचा तो त्यांच्या हयाती पर्यंत मिळत होता. परंतु आज नवीन पेन्शन योजनेमुळे पोलीस कुटुंबांचे भविष्य हे अंधकारनी आहे कारण जे सेवेत आहे त्यांना दुर्देवाने जर काही झाले तर त्यांच्या कुटुंबीयांना शहरात असतील तर धुनी भांडी व गावाकडे असतील तर शेतामध्ये काम करण्याची परिस्थिती निर्माण होईल असे गीता रासकर यांनी केलेल्या मागणीत म्हटले आहे.

तसेच लोकप्रतिनिधींना देखील जुनी पेन्शन योजना चालू असून पोलीस कर्मचाऱ्यांना सदर योजना बंद असा भेदभाव बंद करत पोलिसांना एक महिन्याचा पगार बोनस देत जुनी पेंशन योजना लागू करावी अशी मागणी पोलीस पत्नी गिता तेजस रासकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्याकडे केली आहे.