शिक्रापुरात दुकानाची भिंत तोडून लाखोंची चोरी

क्राईम शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील मुख्य चौकट असलेल्या एका हार्डवेअर दुकानाची पाठीमागील भिंत तोडून आतमध्ये प्रवेश करुन चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील चाकण चौक येथे विक्रम सोलंकी यांचे ओम हार्डवेअर अँड इलेक्ट्रोनिक्स दुकान असून २४ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास सोलंकी हे दुकान बंद करून घरी गेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळच्या सुमारास सोलंकी पुन्हा दुकानात आल्यानंतर ते शटर उघडून दुकानात आले असता त्यांना दुकानातील काही साहित्य अस्थाव्यस्थ असल्याचे दिसले. त्यामुळे त्यांनी दुकानात पाहणी केली असता दुकानाच्या पाठीमागील भिंत तुटलेली असल्याचे निदर्शनास आले.

त्यामुळे त्यांनी दुकानातील पाहणी केली असता चोरट्यांनी दुकानाच्या पाठीमागील भिंत तोडून आतमध्ये प्रवेश करून दुकानातील विक्री साठी असलेले वेल्डिंग मशीन, ऑक्सिजन रेग्यूलेटर, पक्कड, पहाणे यांसह आदी साहित्य असा अंदाजे एक लाख पंचावन्न हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे दिसून आले.

याबाबत विक्रम रतनसिंग सोलंकी (वय ३६) रा. जाधवनगर शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे मूळ रा. माणी पोस्ट गुडारामसिंह ता. मारवाड जि. पाली राजस्थान यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे व पोलीस नाईक रोहिदास पारखे हे करत आहे.