शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे एका नराधम बापाने (दि. २८) सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास आपल्याच मुलीला नदीमध्ये फेकून देत मुलगी बेपत्ता झाल्याबाबतचा बनव केला होता. मात्र सदर नराधम बापानेच खून केल्याचे निष्पन्न झाले होते. मात्र मुलीचा मृतदेह सापडत नसताना पोलिसांनी कसून शोध घेतला असता आज अखेर चौथ्या दिवशी सदर मुलीचा मृतदेह शिक्रापूर वेळ नदीच्या बंधाऱ्यामध्ये मिळून आला आहे.
शिक्रापूर (ता. शिरुर) येथे अपेक्षा सोळुंके या बालिकेचा तिचाच नराधम बाप युवराज सोळुंके याने खून केला होता, सदर घटनेमुळे खळबळ उडाली होती. पोलिसांनी नराधम बापाला बेड्या ठोकल्या मात्र वेळ नदीला अचानक पुर आल्याने मुलीचा मृतदेह शोधण्यात अडचण निर्माण होत होत्या.
दरम्यान शिक्रापूर पोलिसांनी तळेगाव ढमढेरे, विठ्ठलवाडी, शिवतक्रार म्हाळुंगी येथे जात स्थानिक नागरिकांच्या मदतीने शोध मोहीम राबवली. मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने मुलीचा मृतदेह मिळत नव्हता मात्र शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे, रणजीत पठारे, पोलीस हवालदार शंकर साळुंके, श्रीमंत होनमाने, शिवाजी चीतारे, पोलीस नाईक अमोल दांडगे, रोहिदास पाखरे, लखन शिरसकर यांसह आदींनी काही जवानांच्या मदतीने शिक्रापूर वेळ नदीमध्ये शोध मोहित राबवली असता बाजार मैदानाच्या पुढे महाबळेश्वर नगर नजीक बंधाऱ्यात बेपत्ता अपेक्षाचा मृतदेह नुकताच आढळून आला असून पोलिसांनी सदर मृतदेह ताब्यात घेतला आहे. अपेक्षाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करत मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.