शिक्रापूरात बालकांच्या थंडी, ताप, सर्दी, खोकला आजारात वाढ

शिरूर तालुका

ग्रामपंचायत प्रशासनासह आरोग्य विभागाने उपाययोजना करणे गरजेचे

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) सह परिसरात सध्या बालकांमध्ये थंडी, खोकला, ताप, सर्दी या आजारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याची बाब चिंताजनक असून ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य विभागाने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथे सध्या लहान बालकांमध्ये सर्दी, खोकला, थंडी, ताप यांसारख्या आजाराची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे, एकीकडे पावसाच्या ये जा मुळे शेतकरी वर्ग अडचणीत सापडलेला असताना आता वातावरणातील बदला मुळे लहान बालकांच्या आजारांमध्ये देखील वाढ होऊ लागली आहे, शिक्रापूर येथे लहान बालकांचे ५ ते ६ हॉस्पिटल असून प्रत्येक हॉस्पिटल मध्ये सरासरी १५० ते २०० लहान बालके उपचारासाठी येत असल्याचे चित्र नव्याने निर्माण झालेले आहे.

सध्या पावसामुळे वाढणारे डास तसेच वातावरणातील बदल तसेच सध्या कोरोना नसल्याचा नागरिकांचा भ्रम त्यामुळे पालकांकडून होत असलेले दुर्लक्ष याला कारणीभूत ठरत आहे. मात्र एकाचे बालक आजारी पडल्यानंतर त्या घरातील इतर बालके देखील आजारी पडू लागलेली असल्यामुळे नागरिक देखील चिंता ग्रस्त झालेले आहेत. अलीकडील काळामध्ये ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य विभागाकडून योग्य खबरदारी देखील घेतली जात नसल्याने अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झालेले आहे तर आरोग्य विभागाकडून औषधे वाटप तसेच फवारणी करणे देखील बंद झालेले असल्यामुळे आजारांमध्ये वाढ होऊ लागली आहे. मात्र ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य विभाग आतातरी गांभीर्याने घेणार का याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

प्रशासनाकडून जनजागृती आवश्यक: डॉ. संदीप वाव्हळ (बाल रोग तज्ञ)
सध्या बालकांमधील आजार झपाट्याने वाढत असताना पालकांनी मुलांना मास्कचा वापर करत कोरोना सारखी काळजी घेण्याची गरज असून प्रशासनाने देखील याबाबत योग्य जनजागृती करणे गरजेचे असल्याचे शिक्रापूर येथील वाव्हळ हॉस्पिटलचे संचालक बाल रोग तज्ञ डॉ. संदीप वाव्हळ यांनी सांगितले.

गावात सध्या फवारणी सुरु केली आहे: शिवाजी शिंदे (ग्रामविकास अधिकारी)
शिक्रापूर गावात प्रत्येक वाडी वस्तीवर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मार्फत जंतनाशक फवारणी सुरु केलेली असून गावातील प्रत्येक ठिकाणी सदर फवारणी करण्यात येणार असल्याचे ग्रामविकास अधिकारी शिवाजी शिंदे यांनी सांगितले.